माजी मंत्र्यांच्या अटकेसाठी गोव्यात आलेले मुंबई पोलीस हात हलवीत परतले
By वासुदेव.पागी | Updated: November 11, 2023 15:18 IST2023-11-11T15:15:54+5:302023-11-11T15:18:03+5:30
गोव्यात आलेले मुंबई आर्थिक गुन्हा विरोधी पथकाचे पोलीस पथकाला परुळेकर यांना अटक न करताच परत जावे लागले.

माजी मंत्र्यांच्या अटकेसाठी गोव्यात आलेले मुंबई पोलीस हात हलवीत परतले
पणजी: माजी मंत्री सुरेश परुळेकर यांना अटक करण्यासाठी गोव्यात आलेले मुंबई आर्थिक गुन्हा विरोधी पथकाचे पोलीस पथकाला परुळेकर यांना अटक न करताच परत जावे लागले आहे. भुखंड खरेदी करून देण्याचे सांगून मुंबई स्थित इसमाची १४.९ कोटी रुपयांची फसणूक करण्याच्या प्रकरणात परुळेकर यांना अटक करण्यासाठी मुंबई आर्थिक गुन्हा विभागाचे पथक चार दिवसांपूर्वी गोव्यात दाखल झाले होते. विशेष म्हणजे, याप्रकरणी परूळेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी पत्नी मंदा आणि पुत्र प्रसाद यांच्याविरोधातही गुन्हे दाखल झाले आहे. या तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज ३१ ऑक्टोबर रोजी मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला होता.
परूळेकर त्यांच्या पत्नी आणि मुलगा हे रेईश-मागूश रिअल इस्टेट कंपनीचे संचालक आहेत. या तिघांनी भूखंड देण्याचे आमिष दाखवून फसवल्याची तक्रार प्रेमचंद गावस (मूळ डिचोली) यांनी २० जून २०२३ रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडे नोंदवली होती. तक्रारीनुसार, गावस यांनी जानेवारी २००८ ते फेब्रुवारी २०२३ या काळात परूळेकर यांना नियमित हप्त्यांमध्ये १४.९ कोटी रुपये दिले होते. गावस आणि तिन्ही संचालकांमध्ये जमीन व्यवहारासंदर्भातील सर्व बैठका ताडदेव-मुंबई येथे झाल्या होत्या.
मुंबई पोलीस दोन दिवस गोव्यात थांबले. परंतु परुळेकर यांना न घेताच ते मुंबईला परतल्याची माहिती मुंबई आर्थिक गुन्हा विरोधी विभागातील सूत्रांकडून देण्यात आली. तसेच हे पथक गोव्यात पुन्हा याच प्रकरणातील तपासासाठी येण्याची शक्यता असल्याचेही मुंबईहून सांगण्यात आले.