नाताळसाठी गोव्यात येताना अपघातात आई जागीच ठार
By Admin | Updated: December 26, 2014 02:10 IST2014-12-26T02:03:22+5:302014-12-26T02:10:33+5:30
सावर्डेजवळील घटना : पत्नी, दोन मुलांसह चौघे जखमी

नाताळसाठी गोव्यात येताना अपघातात आई जागीच ठार
सावर्डे : नाताळ साजरा करण्यासाठी गोव्यात येताना वाटेत अपघात होऊन आईला मुकावे लागले. पत्नी व मुलांबरोबरच स्वत:ही जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. ही हृदयद्रावक घटना सावर्डे भागात गुरुवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी घडली.
उपलब्ध माहितीनुसार सर्जापूर रोड, बंगळुरू येथील सोमेश निमयचंद अवदी (४२) हे आई बेतिका निमयचंद अवदी (६४), पत्नी इप्सीता सोमेश अवदी (३७), मुलगा श्रेश (७) व मुलगी स्वरणिका (४) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास गाडी (केए 0३ एमएस ४७१२) ही ‘एक्सयुव्ही’ घेऊन गोव्यात येत होते. बंगळुरूहून हुबळीमार्गे गोव्यात येत असता पेरिउदक, सावर्डे येथे सकाळी १0.३0 वाजण्याच्या सुमारास चालक सोमेश अवदी यांचा गाडीवरचा ताबा सुटून ती रस्त्याच्या डाव्या बाजूने सुमारे १५ मीटरपर्यंत फरफटत गेली व झाडावर धडकली. गाडीतील बेतिका अवदी यांचा चिरडून मृत्यू झाला. चालक सोमेश अवदी, त्यांचा मुलगा श्रेश, मुलगी स्वरणिका व पत्नी इप्सीता अवदी जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना काकोडा-कुडचडे येथील सरकारी इस्पितळात व नंतर मडगावच्या खासगी हॉस्पिटलात पाठविले.
सावर्डेचे सुहास सावर्डेकर व इतर लोकांनी जखमींना मदत केली. हवालदार प्रदीप नाईक यांनी पंचनामा केला. पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन सांगोडकर तपास करीत आहेत. (लो.प्र.)