गोव्याच्या बांधकाम क्षेत्रास अधिक निधी
By Admin | Updated: June 24, 2014 01:21 IST2014-06-24T01:21:27+5:302014-06-24T01:21:37+5:30
पणजी : गेल्या वर्षी गोव्याच्या बांधकाम क्षेत्रास जेवढा निधी मिळाला, त्यापेक्षा जास्त निधी या वेळी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन

गोव्याच्या बांधकाम क्षेत्रास अधिक निधी
पणजी : गेल्या वर्षी गोव्याच्या बांधकाम क्षेत्रास जेवढा निधी मिळाला, त्यापेक्षा जास्त निधी या वेळी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिल्लीत झालेल्या बैठकीवेळी गोव्याचे बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांना दिली.
गेल्या वर्षी गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग व अन्य रस्त्यांच्या कामासाठी केंद्राने प्रथम १७५ कोटी रुपये आणि नंतर २५ कोटी रुपये मिळून एकूण दोनशे कोटी रुपये दिले होते. यंदा यापेक्षा जास्त निधी दिला जाईल, अशी ग्वाही मंत्री गडकरी यांनी आपल्याला दिल्याचे मंत्री ढवळीकर यांनी दिल्लीतील बैठकीनंतर ‘लोकमत’ला सांगितले.
जुवारी पुलाबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे यापूर्वी गडकरी यांच्याशी बोलले आहेत. आपण गोव्याच्या बांधकाम क्षेत्रातील अन्य विषयांबाबत गडकरी यांच्याशी चर्चा केली. यंदा सुमारे तीनशे कोटींचा निधी अपेक्षित आहे, असे ढवळीकर म्हणाले.
दरम्यान, मंगळवारी गोव्याचे प्रधान बांधकाम सचिव व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे. त्या वेळी गोव्यातील राष्ट्रीय महामार्गांवरील विविध पूल, राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण व अन्य प्रस्तावांबाबत चर्चा होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. जुवारी नदीवर दुसरा पूल बांधण्यासाठी गोव्याला केंद्राकडून एक हजार कोटींपेक्षा जास्त निधीची गरज असल्याचे गोव्याने यापूर्वीच केंद्राला कळविले आहे. एवढा निधी देण्याची मोदी सरकारची तयारी आहे, असे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)