मोपाप्रश्नी एलिना यांनी डागली तोफ

By Admin | Updated: October 8, 2014 01:28 IST2014-10-08T01:26:41+5:302014-10-08T01:28:01+5:30

पणजी : दोन विमानतळांसाठी गोवा हे खूप छोटे राज्य ठरते, असे सांगत वनमंत्री एलिना साल्ढाणा यांनी मंगळवारी अप्रत्यक्षरीत्या सरकारच्या मोपा विमानतळ धोरणावरच तोफ डागली.

Moppi | मोपाप्रश्नी एलिना यांनी डागली तोफ

मोपाप्रश्नी एलिना यांनी डागली तोफ

पणजी : दोन विमानतळांसाठी गोवा हे खूप छोटे राज्य ठरते, असे सांगत वनमंत्री एलिना साल्ढाणा यांनी मंगळवारी अप्रत्यक्षरीत्या सरकारच्या मोपा विमानतळ धोरणावरच तोफ डागली. मी माझे पती स्व. माथानी साल्ढाणा यांच्याच भूमिकेची पाठराखण करीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोव्याला खास दर्जा मिळायला हवा, या मागणीविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी मंत्री साल्ढाणा व इतरांची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्याबाहेर पत्रकारांशी साल्ढाणा यांनी संवाद साधला. मोपा विमानतळाविषयी तुम्ही मुख्यमंत्र्यांसमोर यापूर्वी कोणती भूमिका मांडली आहे व तुमचा स्वत:चा मोपा विमानतळास विरोध आहे काय, असे पत्रकारांनी विचारले असता, त्या म्हणाल्या की, मी एक नोट मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. त्यात नियोजित मोपा विमानतळाच्या विषयाबाबत माझ्या मतदारसंघातील लोकांच्या मनात जी भीती आहे, ती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली आहे. दाबोळी हा कायम नागरी विमानतळ असेल, अशी माझे पती माथानी यांची भूमिका होती. दोन विमानतळांसाठी गोवा हे एकदम छोटे राज्य आहे. मोपाविषयी माथानी यांची जी भूमिका होती, तीच भूमिका मी स्वीकारीन. मला तीच भूमिका मान्य आहे.
मंत्री साल्ढाणा म्हणाल्या की, मोपाला अगोदर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मान्यता मिळायला हवी. पर्यावरणविषयक अभ्यास झाल्यानंतर व पर्यावरणविषयक दाखला मिळाल्यानंतरच मोपासाठी निविदा जारी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आहे. पर्यावरणविषयक अभ्यास अजून सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: Moppi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.