‘मोपा’च्या निविदेचे ‘उड्डाण’ लांबणीवर

By Admin | Updated: November 8, 2015 02:28 IST2015-11-08T02:28:24+5:302015-11-08T02:28:42+5:30

पणजी : मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा तथा आरएफपीचा मसुदा मंत्रिमंडळाने गेल्या

'Mopa' Tinker's Flight 'Prolonged' | ‘मोपा’च्या निविदेचे ‘उड्डाण’ लांबणीवर

‘मोपा’च्या निविदेचे ‘उड्डाण’ लांबणीवर

पणजी : मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा तथा आरएफपीचा मसुदा मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात मान्य केला तरी, या मसुद्यात काही तांत्रिक दोष असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे निविदा जारी करण्यास विलंब होऊ शकतो, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळाली.
मोपा विमानतळाच्या आरएफपीच्या मसुद्यास यापूर्वी सरकारच्या कायदा खात्याने मान्यता दिली आहे; पण हा मसुदा मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांच्याकडे पाठविण्यात आला. नाडकर्णी यांनी त्या मसुद्यातील काही तांत्रिक व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करून तीन-चार प्रश्न उपस्थित केले आहेत. तांत्रिक बाबी नाडकर्णी यांनी उपस्थित केल्यानंतर त्याविषयी फेरविचार करण्याची जबाबदारी सरकारच्या विमानतळविषयक खात्याकडे आली आहे. निविदा जारी करण्यास विलंब झाला तरी चालेल; पण सर्व काळजी घेऊन मगच निविदा जारी करावी, असे सरकारने ठरविले आहे.
सरकारचे विमानतळ खाते तथा नागरी उड्डाण विभाग ‘एजीं’नी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देणार आहे. त्यासाठी मसुद्यात आवश्यक बदल व दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर तो मसुदा मंजुरीसाठी पुन्हा अ‍ॅडव्होकेट जनरलांकडे पाठविला जाणार आहे. त्यांनी मसुद्यास उत्तर दिल्यानंतरच निविदा जारी करता येईल. दिवाळीच्या मुहूर्तावर आरएफपी जारी करण्याचा सरकारचा मानस होता; पण आता थोडा विलंब होऊ शकतो. नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या प्रारंभी निविदा जारी होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)

Web Title: 'Mopa' Tinker's Flight 'Prolonged'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.