लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने राज्याला झोडपून काढल्यामुळे एकूण सरासरी पाऊस ९२ इंचावर पोहोचला आहे. मंगळवारी आणि बुधवारीही पाऊस पडणार आहे, परंतु जोर किंचित ओसरणार असल्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहेत.
काणकोण, सासष्टी, धारबांदोडा, केपे, फोंडा आणि साखळीत पावसाचा जोर जास्त आहे. सोमवारी सकाळी ८.३० पर्यतच्या २४ तासांत राज्यात सरासरी ४ इंच इतका पाऊस पडला तर सर्वाधिक पाऊस साखळी, मडगाव आणि धारबांदोडा येथे ५ इंचाहून अधिक पडला. या पावसामुळे पुन्हा एकदा इंचाच्या शतकाकडे मान्सूनची जोरदार वाटचाल सुरू झाली आहे. तसेच मान्सूनची तूट भरून येऊन ९ टक्क्यापर्यंत घटली आहे.
यलो अलर्ट जारी
सोमवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला. अधूनमधून उसंत घेत जोरदार पडत होता. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. रविवारी आणि सोमवारी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. मंगळवार आणि बुधवारसाठी यलो अलर्ट जारी केला.