‘त्या’ कैद्याकडून गुंतवणूकदारांना पैसा
By Admin | Updated: January 12, 2015 01:53 IST2015-01-12T01:53:00+5:302015-01-12T01:53:53+5:30
पोलिसांचा संशय : कित्येक कारनामे उघड होण्याची आशा

‘त्या’ कैद्याकडून गुंतवणूकदारांना पैसा
मडगाव : फैक मुश्ताक अहमद करंबेळकर (३५) हा मुंबईतल्या अंडरवर्ल्डमधील पैसा गुंतवणूकदारांना पुरवत होता, असा पोलिसांचा संशय असून, अनेकांना गंडा घालून पोबारा केलेला जयंत नलावडेच्याही तो संपर्कात होता, अशीही माहिती आता पुढे आली आहे.
नलावडे याच्याविरुध्द मडगाव पोलीस ठाण्यातच फसवणुकीचे तब्बल पाच गुन्हे नोंद असून, आतापर्यंत त्याने ३ कोटी ३४ लाखांचा गंडा घातला आहे. नलावडे याचे अनेक पोलीस अधिकाऱ्यांशीही जवळचे संबंध असून, फैक याच्या अटकेमागील सूत्रधारही तोच असावा, अशी चर्चाही सध्या सुरू आहे.
कालकोंडा येथे दोन दिवसांआधी ज्या ठिकाणी फैक याला पोलिसांनी अटक केली, तेथून जवळपासच नलावडे याने आलिशान कार्यालय थाटले होते. फैक हा अटक केलेल्या ठिकाणी अनेक वेळा येऊन जात होता, असे पोलीस दफ्तरी नोंद आहे. या पार्श्वभूमीवर फैकचे नालावडेशीही कनेक्शन असावे हा संशय बळावला आहे.
पोलिसांनी तो राहात असलेल्या नागमोडे येथील घरात तसेच त्याच्या मित्राच्या घराचीही झडती घेतली आहे. मात्र, कुठलीही आक्षेपार्ह बाब तेथे आढळून आली नसल्याची माहिती मडगाव पोलिसांनी दिली.
नलावडे हाही सध्या मडगाव पोलिसांना हवा आहे. एका प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर मागाहून जामीन मिळाल्यानंतर तो पळून गेला होता. सध्या दिल्लीत त्याचे बस्तान असल्याचे वृत्त आहे. पोलीसही त्याला दुजोरा देतात. मात्र, तो अद्यापही पोलिसांना सापडू शकलेला नाही. रक्कम दुप्पट करून देणे तसेच फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून नलावडे याने लोकांना करोडोंचा चुना लावला आहे. (प्रतिनिधी)