गोमंतकीयांनाच ‘मोपा’वर नोकऱ्या!
By Admin | Updated: October 29, 2015 01:58 IST2015-10-29T01:58:20+5:302015-10-29T01:58:35+5:30
पणजी : मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून राष्ट्रीय महामार्गास धारगळ येथे जोडणारा जलदगती महामार्ग बांधला जाणार आहे

गोमंतकीयांनाच ‘मोपा’वर नोकऱ्या!
पणजी : मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून राष्ट्रीय महामार्गास धारगळ येथे जोडणारा जलदगती महामार्ग बांधला जाणार आहे. विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये गोमंतकीयांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. तशा प्रकारची तरतूद सरकारने कंत्राटदार कंपनीशी करावयाच्या कन्सेशन करारामध्ये केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी दिली.
पर्वरी येथील मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मोपा विमानतळासाठी इच्छा प्रस्ताव (आरएफपी) मागविण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. यापूर्वी म्हणजे ३० आॅक्टोबर २०१४ रोजी मोपा विमानतळासाठीची निविदा जारी करण्यात आली होती. ती निविदा दोन टप्प्यांमध्ये होती. प्रथम आरएफक्यूसाठी निविदा निघाली. त्याला कंपन्यांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर पाच कंपन्या शॉर्ट लिस्ट करण्यात आल्या. आता आरएफपी आणि कन्सेशन करारासाठी निविदा जारी केली जाईल. यासाठी कायदेशीर साहाय्य घेण्याकरिता मेसर्स पी.के.ए. अॅडव्हकेट्स-दिल्ली यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्रिमंडळाने मंजूर केलेली आरएफपीची प्रत अॅडव्होकेट जनरलांकडे मान्यतेसाठी पाठविली जाईल. त्यानंतर लगेच आरएफपी व कन्सेशन अॅग्रीमेंटसाठीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मोपासाठी सरकारने दिलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून ठेकेदार कंपनीने १५० कोटी रुपयांची अनामत रक्कम सरकारजवळ ठेवणे अपेक्षित आहे. त्यानंतर ३६ कोटी रुपयांची रक्कम सरकारजवळ जमा करावी लागेल. मोपा विमानतळाचे काम एकूण चार टप्प्यांमध्ये केले जाणार असून चौथ्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम ठेकेदाराला सरकार परत करील, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मोपा येथील कामासाठी
पेडणे किंवा अन्य एखाद्या सरकारी आयटीआयमध्ये स्थानिक मनुष्यबळ प्रशिक्षित केले जाणार आहे. (खास प्रतिनिधी)