गोव्यातील यशाचे श्रेय मोदी व पर्रीकरांना
By Admin | Updated: May 17, 2014 01:57 IST2014-05-17T01:52:02+5:302014-05-17T01:57:22+5:30
पणजी : नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून देशात आलेली लाट व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी समाजाच्या विविध घटकांसाठी राबविलेल्या योजना,

गोव्यातील यशाचे श्रेय मोदी व पर्रीकरांना
पणजी : नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून देशात आलेली लाट व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी समाजाच्या विविध घटकांसाठी राबविलेल्या योजना, या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून भाजपला या लोकसभा निवडणुकीत गोमंतकीयांनी विक्रमी संख्येने मते देत दोन्ही उमेदवार निवडून दिले. खासदार श्रीपाद नाईक व अॅड. नरेंद्र सावईकर या दोघांची प्रतिमा आणि मतदारांशी त्यांनी कायम ठेवलेला संपर्क या गोष्टीही भाजपच्या यशात अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. भाजपची मजबूत पक्ष संघटना, नियोजनबद्ध प्रचार काम आणि आर्थिक व्यवस्थापन यामुळेही मोठा विजय मिळविणे भाजपला शक्य झाले. १९९६ सालानंतर आता प्रथमच गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या. ९६ साली वाजपेयींची लाट होती. चर्र्च संस्थेने ख्रिस्ती धर्मीय मतदारांची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळावीत, अशी व्यवस्था केली होती. मात्र, ख्रिस्ती धर्मियांमधील उच्चशिक्षित मतदारांनी काँग्रेसला जास्त मते दिली नाहीत. काही मते भाजपला, तर काही आम आदमी पक्षाला मिळाली. काँग्रेसचे उमेदवार रवी नाईक यांना हिंदू धर्मियांमधीलही शिक्षित मतदारांनी व विशेषत: महिला मतदारांनी स्वीकारले नाही. काँग्रेस पक्ष संघटनाही भाजपच्या तुलनेत उत्तरेत खूपच फिकी ठरली. उत्तर गोव्यात काँग्रेसला १ लाख ३२ हजार ३०४ मते मिळाली, तर भाजपचे श्रीपाद नाईक यांना २ लाख ३७ हजार ९०३ मते प्राप्त झाली. सलग चौथ्यांदा उत्तर गोव्यातून निवडून येण्याचा विक्रम श्रीपाद नाईक यांनी केला. आम आदमी पक्षाचे उमेदवार दत्ताराम देसाई यांना १५ हजार ८५६ मतांवर समाधान मानावे लागले. उत्तर गोव्याप्रमाणेच दक्षिण गोव्यातही खाणग्रस्त भागातील बहुसंख्य मतदारांनी भाजपला कौल दिला. शिवाय त्याही मतदारसंघात महिलांची मते भाजपलाच जास्त मिळाली. गृह आधार, लाडली लक्ष्मी, ज्येष्ठ नागरिकांसाठी दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, खाण अवलंबितांसाठी दरमहा अर्थसाहाय्य योजना या सर्वांची पावती दक्षिणेतीलही मतदारांनी भाजपला दिली. नरेंद्र सावईकर हे १ लाख ९८ हजार ७७६ मते मिळवून विजयी झाले. काँग्रेसचे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना १ लाख ६६ हजार ४४६ मते मिळाली. ‘आप’च्या स्वाती केरकर यांना ११,२४६, तर चर्चिल आलेमाव यांना ११,९४१ मते मिळाली. दक्षिणेत ख्रिस्ती मतदार काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले. (खास प्रतिनिधी)