सरकारच्या खर्चाने मंत्र्यांची जगभ्रमंती
By Admin | Updated: June 18, 2014 07:24 IST2014-06-18T07:23:23+5:302014-06-18T07:24:51+5:30
पणजी : लोकांनी टीका करो किंवा ‘कॅग’ने आक्षेप घेवो. मात्र, कशाचीही पर्वा न करता गोव्यातील अनेक मंत्री व आमदार वारंवार विदेश दौरे करत असल्याचे

सरकारच्या खर्चाने मंत्र्यांची जगभ्रमंती
पणजी : लोकांनी टीका करो किंवा ‘कॅग’ने आक्षेप घेवो. मात्र, कशाचीही पर्वा न करता गोव्यातील अनेक मंत्री व आमदार वारंवार विदेश दौरे करत असल्याचे आढळून आले आहे. शासकीय खर्चाने काही मंत्री तर जग फिरले आहेत. अजूनही विदेश वाऱ्या सुरू आहेत.
शासकीय खर्चाने ब्राझीलच्या दौऱ्यावर जाण्याचा विषय गोव्याच्या काही मंत्री व आमदारांच्या नुकताच अंगलट आला. देशभरातून त्यावर टीका झाल्याने आता आपण शासकीय खर्चाने ब्राझीलला जाणार नाही, असे मंत्री व आमदारांना जाहीर करावे लागले. काही अधिकारीही वारंवार विदेश दौरे करत आहेत. यापुढे पर्यटन खाते बराच मोठा खर्च करून युरोपचा दौरा करणार आहे. सेंट झेवियरचा शव प्रदर्शन सोहळा येत्या नोव्हेंबरमध्ये होणार आहे. दर दहा वर्षांनी हा सोहळा होतो. यापूर्वी कधीच कुणी युरोपमध्ये फिरून या सोहळ्याबाबत जागृती केली नाही. मात्र, या वेळी सरकारमधील काहीजणांना युरोपमध्ये फिरून येण्याची व तिथे रोड शो करण्याची संधी ‘गोंयच्या सायबा’ने दिली आहे. त्या मोहिमेची तयारी सध्या सुरू आहे.
कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहण्यासाठी यापूर्वी जर्मनीमध्ये बरेच मोठे ताफे पाठविण्यात आले होते. त्यावर काही कोटी रुपयांचा खर्च झाला. उपमुख्यमंत्र्यांसह काही मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी वगैरे त्या वेळी जर्मनीला जाऊन तेथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहून आले. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे पोर्तुगालच्या दौऱ्यावर गेले होते. एक-दोन मंत्री वगळता बहुतेक मंत्र्यांनी, भाजपच्या बहुतेक आमदारांनी व एक-दोन अपक्ष मंत्री-आमदारांनी गेल्या दोन वर्षांत बरेच विदेश दौरे केले आहेत. बहुतेक दौऱ्यांवर सरकारने लाखो रुपयांचा खर्च केला. यापूर्वी ‘कॅग’ने आपल्या अहवालांत या सगळ्या खर्चावर बोट ठेवले आहे. मोठ्या प्रमाणात विदेशात झालेले रोड शो हेही चर्चेचे विषय बनले आहेत. २00७ ते २0१२ या कालावधीत राज्य सरकारकडून रोड शोवर १९ कोटी खर्च करण्यात आले. (खास प्रतिनिधी)