‘मंत्र्यांनी झोकून देऊन काम केले नाही’
By Admin | Updated: March 22, 2015 01:18 IST2015-03-22T01:14:11+5:302015-03-22T01:18:01+5:30
पणजी : भाजपच्या काही मंत्री व आमदारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी झोकून देऊन काम केले नाही. ज्यांनी काम केले,

‘मंत्र्यांनी झोकून देऊन काम केले नाही’
पणजी : भाजपच्या काही मंत्री व आमदारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी झोकून देऊन काम केले नाही. ज्यांनी काम केले, त्यांच्या भागात पक्षाचे उमेदवार निवडून आले, ज्यांनी काम केले नाही त्यांच्या मतदारसंघात उमेदवार पराभूत झाले, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
पार्सेकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना जिल्हा पंचायत निवडणूक निकालाचे विश्लेषण केले. भाजप व एकूणच सत्ताधारी आघाडी कुठे कमी पडली, हेही त्यांनी सांगितले. प्रश्नोत्तराच्या रूपात मुलाखत खालीलप्रमाणे-
ॅ भाजपचे अनेक जिल्हा पंचायत मतदारसंघात उमेदवार का पडले असे तुम्हाला वाटते?
- भाजपच्या मंत्री व आमदारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी झोकून देऊन काम करायला हवे होते. काहीजणांनी तसे केले. काहीजण त्याबाबत कमी पडले. पेडणे तालुक्यात आमचे दोन उमेदवार पराभूत झाले. मी स्वत: माझ्या मतदारसंघात व एकूणच पेडणे तालुक्यात जास्त जाऊ शकलो नाही. आमचे चारही उमेदवार निश्चितच निवडून येतील, असे
मी गृहीत धरले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांमधील रुसवेफुगवे मला कळाले असते तर मी पेडण्यात जाऊन योग्य उपाययोजना केली असती. मी योग्य ती काळजी घेतली असती. तेथील पक्ष संघटना त्याबाबत कमी पडली.
ॅ भाजपच्या काही आमदारांनी जनसंपर्क वाढविणे व लोकांशी नम्रपणे वागणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते का?
- निश्चितच तशी गरज आहे. लोकसंपर्क हा कायम ठेवावा लागतो. मलाही पेडण्यात व माझ्या मतदारसंघात लोकसंपर्क ठेवावा लागेल. समन्वयाबाबत आम्ही कुठे कमी पडू नये. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी आमचे काही मंत्री, आमदार तसेच काही कार्यकर्ते जेवढे सक्रिय व्हायला हवे होते तेवढे ते झाले नाहीत.
ॅ काँग्रेसने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला तरीही भाजपला घवघवीत यश का मिळाले नाही?
- काँग्रेस पक्ष जर निवडणूक रिंगणात असता तर भाजपला जास्त जागा मिळाल्या असत्या. भाजप जास्त जिल्हा पंचायत मतदारसंघात निवडून आला असता. काँग्रेसची हात निशाणी रिंगणात नव्हती. त्यामुळे आमच्याविरुद्ध सर्व विरोधकांची मते एकत्रित झाली. काँग्रेसची निशाणी असती तर काँग्रेसचा उमेदवार व अपक्ष उमेदवार अशी मतविभागणी झाली असती, जी भाजपसाठी अनुकूल ठरली असती. आमचे काही उमेदवार हे अवघ्या शंभर ते दोनशे मतांच्या फरकाने पडले.
ॅ सरकारचे काही निर्णय किंवा धोरणे चुकली असे तुम्हाला वाटते काय?
- सरकारची कामगिरी व जिल्हा पंचायत निवडणुकांचे निकाल याचा तसा थेट परस्पराशी काही संबंध लावता येणार नाही. सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी काही पूर्ण गोवा मतदान प्रक्रियेत सहभागी झाला नाही. त्यामुळे जय-पराजयास सरकारचे निर्णय किंवा धोरणे जबाबदार आहेत असे थेट म्हणता येणार नाही. सरकारचे कोणतेच निर्णय किंवा धोरणे चुकलेली नाहीत. जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्याचा आमचा निर्णयही योग्य ठरला. (पान २ वर)