नव्या वर्षात खाणींचा जॅकपॉट; मेपर्यंत आणखी पाच खाण ब्लॉक सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2024 08:52 IST2024-12-28T08:51:16+5:302024-12-28T08:52:28+5:30
जानेवारी महिन्यात दोन खाणींना मुहूर्त

नव्या वर्षात खाणींचा जॅकपॉट; मेपर्यंत आणखी पाच खाण ब्लॉक सुरू होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: नवीन वर्षात खाणींच्या बाबतीत आशादायी चित्र पुढे येत आहे. जानेवारी महिन्यात राजाराम बांदेकर व साळगावकर शिपिंग कंपनीकडे ई- लिलांवात गेलेले दोन तर मे महिन्यापर्यंत कुडणेतील दोन व थिवी- पीर्ण येथील एक मिळून आणखी तीन, असे पाच खाण ब्लॉक सुरु होतील. कुडणेतील दोन व थिवी-पीर्ण या दोन खाण ब्लॉकना पर्यावरणीय परवाने (ईसी) मिळाले आहेत. खाण खात्याचे संचालक नारायण गाड यांनी यास दुजोरा दिला.
कुडणेचा ७५ हेक्टरचा खाण ब्लॉक ७ वेदांता कंपनीकडे गेला आहे. वर्षाकाठी ०.५ दशलक्ष टन खनिज या खाणीतून काढले जाईल. या खाण ब्लॉकमध्ये कुडणे, होंडा, सोनूस हा डिचोली व सत्तरीतील भाग येतो. कुडणेचा ३८ हेक्टरचा दुसरा खाण ब्लॉक - ६ जिंदाल साउथ वेस्ट (जेडब्ल्यूएस) कंपनीकडे गेला आहे. कुडणे, करमळें भाग या ब्लॉकमध्ये येतो. या खाणीतूनही वर्षाकाठी ०.५ दशलक्ष टन खनिज काढले जाईल. थिवी-पीर्ण खाण ब्लॉक ८ ओडिशातील काय इंटरनॅशनल कंपनीकडे गेला आहे. हा खाण ब्लॉक ७२ हेक्टरचा असून वर्षाकाठी ०.३ दशलक्ष टन खनिज या खाणीतून काढले जाईल. हे तिन्ही खाण ब्लॉक २००६ च्या पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन अधिसूचनेनुसार व वर्गवारीत येतात. या खाण ब्लॉकना ईसीसाठी राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. तिन्ही ब्लॉकना ईसी प्राप्त झालेल्या आहेत.
मोंत द शिरगांव ब्लॉक ९५.६७ हेक्टरचा असून या खाणीतून वर्षाकाठी ०.५ दशलक्ष टन खनीज काढले जाईल. मयेंचा खाण ब्लॉक - २ हा एकुण १७२ हेक्टरचा असून यातील ५५.४५ हेक्टर क्षेत्रात खनिजसाठा आहे. मावळत्या वर्षात वेदांता कंपनीचा मुळगाव येथील व फोमेतो कंपनीचा अडवलपाल येथील खाण ब्लॉक सुरु झालेला आहे. या भागात खनिज वाहतुकही सुरु झालेली असून त्यामुळे या खाणपट्ट्यात सजगताही आलेली आहे.
सरकारने बेकायदेशीपणा आरंभलाय
खाणविरोधी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गावस म्हणाले की, सरकारने बेकायदेशीरपणा आरंभला आहे. खाण ब्लॉकचा लिलांव करण्यापूर्वी कायद्याने सीमांकन करायला हवे होते. ते केलेले नाही. खाण मालकांचा फायदाच करुन दिलेला आहे. लामगाव, मुळगाव भागात आधीच तळी बुजलेली आहेत. पावसाळ्यात खनिजमाती वाहून शेतात येते. हे प्रकार पुन्हा सुरु होतील. सरकारला रहिवाशांच्या सुखदुःखाचे सोयरसूतक नाही.
२ खाणी पुढील महिन्यात सुरु होण्याची दाट शक्यता
येत्या महिन्यात राजाराम बांदेकर कंपनीकडे गेलेला मोंत द शिरगाव खाण ब्लॉक -३ व साळगावकर शिपिंग कंपनीकडे गेलेला मये दोन्ही खाणी सुरू खाण ब्लॉक-२ या होण्याची दाट शक्यता असल्याचे खाण संचालक नारायण गाड यांनी सांगितले. दोन्ही खाणींना ईसी मिळालेल्या आहेत. एका कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन परवानेही मिळालेले आहेत. दुसग्रा कंपनीला प्रदूषण नियंत्रणचा एक परवाना प्राप्त झालेला आहे. उर्वरित परवानाही प्राप्त होईल. व पुढील महिन्यापासून त्या सुरु होतील. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे मार्गदर्शन तसेच मुख्य सचिव व्ही. कांडावेलू यांच्या सहकार्यामुळे खाण व्यवसाय पूर्ववत मार्गावर आणणे शक्य झाले आहे.