खनिज वाहतूक आजपासून?
By Admin | Updated: December 14, 2015 01:11 IST2015-12-14T01:10:58+5:302015-12-14T01:11:38+5:30
फोंडा : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या विनंतीवजा आवाहनाकडे दुर्लक्ष करून अखिल गोवा ट्रकमालक संघटना आपले

खनिज वाहतूक आजपासून?
फोंडा : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या विनंतीवजा आवाहनाकडे दुर्लक्ष करून अखिल गोवा ट्रकमालक संघटना आपले आंदोलन सुरूच ठेवण्याबाबत ठाम असून खनिज वाहतुकीसाठी रास्त दर मिळेपर्यंत माघार नाही, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दुसरीकडे सेसा कंपनीसंबंधित उपजिल्हाधिकारी तसेच अन्य यंत्रणांना निवेदने देऊन सोमवारी पोलीस बंदोबस्तात खनिज वाहतूक सुरू करण्याच्या हालचाली करीत असून सोमवारी बॉम्बे रोड जंक्शनवर राडा होण्याची दाट शक्यता खाणपट्ट्यात व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, सेसा कंपनीतर्फे सोमवारपासून खनिज वाहतूक सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. रविवार (दि. १३) असूनही काही ट्रक भरले गेल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे. ट्रकमालक संघटनेकडून असणारा संभाव्य धोका लक्षात घेता सेसातर्फे डिचोली उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस तसेच अन्य संबंधित यंत्रणांना निवेदने दिली जाणार असून दुपारपर्यंत खनिज वाहतूक सुरू केली जाणार आहे. दुसरीकडे ट्रकमालक संघटनेने कोणत्याही परिस्थितीत रास्त वाहतूक दर मिळेपर्यंत खनिज वाहतूक सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने सोमवारी ट्रकमालकांचे आंदोलन भडकण्याची शक्यता आहे. यासंबंधी ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र, संघटनेशी संबंधित ट्रकमालकाच्या माहितीनुसार, संघटना सरकार तसेच सेसा कंपनीच्या दडपशाहीविरुध्द कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असून माघार घेणार नाही. (प्रतिनिधी)