खाणमालकांनी लपवला माल! पणजी : कावरे येथून खनिजाची बेकायदा वाहतूक होणे शक्य नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे कावरेतील ग्रामस्थांसमोर स्पष्ट केले. यापूर्वी काही खाणमालकांनी माल लपवला होता; पण आता तसे घडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी कावरेतील ग्रामस्थांची बैठक घेतली. त्या वेळी गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड व खाण खात्याचेही अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी जेव्हा राज्यभर खनिज मालाचे सर्वेक्षण झाले झाले होते, त्या वेळी काही खाणमालकांनी थोडा खनिज माल लपवला होता; पण आता तसे झालेले नाही. ई-लिलावात गेलेला दोन लाख टन खनिज माल कावरे येथे आहे. तिथे आणखीही माल असू शकतो; पण त्याची मालकी सरकारकडे आहे. तेथील जादा माल बेकायदा पद्धतीने वाहतुकीसाठी किंवा निर्यातीसाठी जाऊच शकत नाही; कारण सध्या जे ट्रक खनिज वाहतूक करत आहेत, त्या ट्रकांना ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम’ (व्हीटीएस) बसविण्यात आली आहे. व्हीटीएस नसेल, तर ट्रकाला चलन व ट्रीप शीट दिली जात नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)
खाणमालकांनी लपवला माल!
By admin | Updated: May 15, 2014 09:39 IST