मिकी पाशेको ‘बेपत्ता’
By Admin | Updated: April 12, 2015 01:07 IST2015-04-12T01:07:29+5:302015-04-12T01:07:39+5:30
पणजी/मडगाव : अटक वॉरन्ट घेऊन पोलीस आपल्या मागावर आहेत आणि दुसऱ्या बाजूने फेरविचार याचिकेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून

मिकी पाशेको ‘बेपत्ता’
पणजी/मडगाव : अटक वॉरन्ट घेऊन पोलीस आपल्या मागावर आहेत आणि दुसऱ्या बाजूने फेरविचार याचिकेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिलासा मिळालेला नाही, अशा परिस्थितीत अटक चुकविण्यासाठी भाजप सरकारमधील माजी मंत्री आमदार मिकी पाशेको हे बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, मोबाईलच्या टॉवर लोकेशनद्वारे पाशेको यांचा पत्ता लावण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. तसेच पाशेको यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या व्यक्तींचे मोबाईलही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पणजी पोलीस मुख्यालयातील सूत्रांकडून देण्यात आली.
पाशेको यांच्याविरुद्ध अटक वॉरन्ट जारी करण्यासाठी अर्ज करणारे अॅड. आयरिश रॉड्रिगीस यांनी शनिवारी सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्याशी संपर्क साधून पाशेको गायब झाल्याची तक्रार करा, अशी मागणी केली. आपल्या मागणीला सभापतींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा अॅड. रॉड्रिगीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. दरम्यान, उद्भवलेल्या परिस्थितीवर कसा तोडगा काढता येणे शक्य आहे, याची चाचपणी करण्यासाठी पाशेको यांचे जवळचे मित्र लिंडन मोन्तेरो यांनी दिल्लीत धाव
घेतली आहे.
कोलवा पोलिसांना अजूनही पाशेको यांचा थांगपत्ता लागलेला नसून त्यांना पकडण्यासाठी आमचे सर्व ते प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी दिली.
या संदर्भात कोलवाचे पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पाशेको यांच्या बेताळभाटी येथील कार्यालयात व घरात जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता, पाशेको तेथे सापडले नाहीत. त्यांच्या मित्राकडेही चौकशी केली; मात्र त्यांचा पत्ता मिळू शकला नाही.
कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात दोषी ठरलेल्या आणि सहा महिन्यांची शिक्षा भोगायची असलेल्या पाशेको यांच्या विरोधात मडगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कवळेकर यांनी अजामीन अटक वॉरन्ट गुरुवारी जारी केले होते. सात दिवसांत पाशेको यांना अटक करून न्यायालयात हजर करावे, असा आदेश न्या. कवळेकर यांनी दिला होता. (प्रतिनिधी)