मिकी-आवेर्तान यांची ताकद कळणार

By Admin | Updated: March 20, 2015 01:20 IST2015-03-20T01:19:43+5:302015-03-20T01:20:15+5:30

मडगाव : जिल्हा पंचायतीचे शुक्रवारी जाहीर होणारे निकाल उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट करणारे असले तरी या निकालांतून खऱ्या

Mikey-Awarten's strength will be known | मिकी-आवेर्तान यांची ताकद कळणार

मिकी-आवेर्तान यांची ताकद कळणार

मडगाव : जिल्हा पंचायतीचे शुक्रवारी जाहीर होणारे निकाल उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट करणारे असले तरी या निकालांतून खऱ्या अर्थाने आमदारांची कसोटी लागणार आहे. सासष्टीत भाजपाचे भागीदार असलेल्या गोवा विकास पार्टीचे या तालुक्यातील नेमकी ताकद काय हेही स्पष्ट होणार असून ही निवडणूक खऱ्या अर्थाने उमेदवारांसाठी महत्त्वाची नसून गोवा विकास पार्टीचे सर्वेसर्वा असलेले मिकी पाशेको यांच्यासाठीच ती महत्त्वाची आहे.
वेळ्ळीत बेंजामीन सिल्वा व नावेलीत आवेर्तान फुर्तादो यांनाही किती जनाधर आहे ते या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. त्याशिवाय सासष्टीतून दोनच उमेदवार उभे केलेल्या भाजपाचे खाते खोलले जाणार की त्यांनाही मतदार अंगठा दाखवतील, हेही आजचा निकाल स्पष्ट करणारा आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीत गोवा विकास पार्टीने एकूण चार उमेदवारांना उभे केले असले तरी कोलवा मतदारसंघ सोडल्यास इतर कुठल्याही मतदारसंघात गोविपाचे उमेदवार जिंकून येण्याची शक्यता नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. फक्त कोलवा मतदारसंघातून जिल्हा पंचायतीच्या विद्यमान अध्यक्ष नेली रॉड्रिगीस यांचा विजय नक्की समजला जातो. मात्र, स्वत: पाशेको यांना सासष्टीतून आपले तीन उमेदवार जिंकून येण्याची शक्यता वाटते. नेली रॉड्रिगीस या विधानसभा निवडणुकीत गोविपाच्या तिकीटावर कुठ्ठाळीतून निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पाशेको यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनलेल्या नुवे मतदारसंघात पाशेकोंच्या विरोधात असलेले आणि बाबाशान म्हणून संपूर्ण परिसरात परिचित असलेले विल्फ्रेड डिसा यांचेच पारडे जड वाटते. या मतदारसंघातून आपणच निवडून येणार, अशी प्रतिक्रिया डिसा यांनी व्यक्त केली. एरव्ही यापूर्वीची निवडणूक मला काहीशी अवघड गेली होती. मात्र, या वेळी मला केकवॉक मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. डिसा यांनी विधानसभा निवडणूक पाशेको यांच्या विरोधात लढणार हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
कुडतरीतून क्लाफासियो डायस हे उभे असून त्यांच्या विरोधात गोविपाचे अँथनी पिशॉट हे उभे आहेत. मात्र, ही निवडणूक डायस यांच्यासाठी सहज जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डायस हे येत्या विधानसभा निवडणुकीत कुंकळ्ळीतून निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच या निकालाला महत्त्व प्राप्त झाले आहे. नावेलीचा निकाल मंत्री आवेर्तान फुर्तादो यांच्यासाठी, तर वेळ्ळीचा निकाल बेंजामीन सिल्वा यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. गिरदोली मतदारसंघात भाजपाने संजना वेळीप यांना उभे केले आहे. त्यामुळे कुंकळ्ळीचे आमदार राजन नाईक यांचाही जनाधर ही निवडणूक स्पष्ट करणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mikey-Awarten's strength will be known

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.