मिकींच्या नशिबी पुन्हा कारावास?
By Admin | Updated: July 18, 2014 02:05 IST2014-07-18T02:00:29+5:302014-07-18T02:05:40+5:30
मडगाव : वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाणप्रकरणी दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने नुवेचे आमदार मिकी पाशेको यांना गुन्हेगार सुधारणा कायद्यान्वये दिलेल्या

मिकींच्या नशिबी पुन्हा कारावास?
मडगाव : वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाणप्रकरणी दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने नुवेचे आमदार मिकी पाशेको यांना गुन्हेगार सुधारणा कायद्यान्वये दिलेल्या शिक्षेची माफी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. जोशी यांनी कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द करताना पाशेको यांना सुनावलेल्या सहा महिन्यांच्या कैदेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे.
विधानसभा अथिवेशनाच्या तोंडावरच आलेल्या या आदेशामुळे पाशेको आणि त्यांचे समर्थन लाभलेले पर्रीकर सरकार समोर एक नवीच समस्या उभी राहिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांना साहाय्य केल्यामुळे मिकी पाशेको यांना भाजप सरकारात मंत्रिपद मिळणार, अशी हवा होती. मंत्रिपद मिळाले नाही, तरीही एखादे चांगले महामंडळ त्यांच्या पदरात पडेल, असेही बोलले जात होते. आता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना या मारहाण प्रकरणात दोषी ठरविल्याने मंत्रिपदाची बक्षिसी मिळणार की नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निवाड्याने पाशेको राजकीयदृष्ट्या पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
गुरुवारी न्या. जोशी यांनी हा आदेश जारी केला. पाशेको यांनी दोन आठवड्याच्या आत मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयासमोर शरण यावे, असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता पाशेकोसमोर एक तर तुरुंगात जाणे किंवा सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन उच्च न्यायालयाच्या या आदेशाला स्थगिती मागणे असे दोन पर्याय आहेत. निवाड्याची प्रत आल्यावर तिचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया पाशेको यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
(प्रतिनिधी)