मडगाव पालिका कर्मचारी संपावर
By Admin | Updated: July 16, 2015 01:59 IST2015-07-16T01:59:09+5:302015-07-16T01:59:19+5:30
मडगाव : पालिका सफाई निरीक्षकाची अडवणूक केलेल्यांना अटक न झाल्याच्या निषेधार्थ मडगाव पालिका कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून संप सुरू केल्याने पालिकेतील कामे

मडगाव पालिका कर्मचारी संपावर
मडगाव : पालिका सफाई निरीक्षकाची अडवणूक केलेल्यांना अटक न झाल्याच्या निषेधार्थ मडगाव पालिका कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून संप सुरू केल्याने पालिकेतील कामे ठप्प झाली आहेत. सफाई कामगारांनी कचऱ्याचीही उचल न केल्याने गांधी मार्केट व एसजीपीडीए मार्केट या दोन ठिकाणांसह मडगावात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. जोपर्यंत संबंधितांना अटक होत नाही, तोपर्यंत हा संप चालूच राहील, असा इशारा पालिका कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी शहरवासियांना वेठीस धरू नये, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
पालिकेचे सफाई निरीक्षक विराज आराबेकर यांची अडवणूक केल्याचा आरोप असलेले क्रॉयडन मेदेरा, नेल्सन फर्नांडिस व माजी नगरसेविका अॅथल लोबो या तिघांना मंगळवारपर्यंत अटक करा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती; पण ती पूर्ण न झाल्यामुळे बुधवारपासून या संपाला सुरुवात झाली. बुधवारी सकाळी पालिका कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेसमोर धरणे धरले. या वेळी गोवा नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू हेही
उपस्थित होते.
मडगाव पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला हा संप शहरवासियांना अडचणीचा होणार यासाठी आंदोलकांचे नेते अॅड. राजीव गोमीस यांनी बुधवारी सकाळी पालिका कर्मचाऱ्यांसमोर येऊन समझोता करण्याचा प्रयत्न केला. गरज पडल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, शहराला वेठीस धरू नका, अशी विनंती अॅड. गोमीस यांनी केली. मात्र, ही विनंती कामगारांनी धुडकावली. या वेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू म्हणाले, कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांची कुणी अडवणूक केली आणि जर दोषींवर कारवाई झाली नाही तर कर्मचारी आपले नीतिधैर्य गमावून बसतील. (पान २ वर)