पणजीत शनिवारी मराठी साहित्य संमेलन
By Admin | Updated: October 20, 2015 02:24 IST2015-10-20T02:24:25+5:302015-10-20T02:24:35+5:30
पणजी : मिनेझिस ब्रागांझा संस्था, युनियन बँक आॅफ इंडिया व माधव राघव प्रकाशन, ताळगावतर्फे येत्या शनिवारी एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पणजीत शनिवारी मराठी साहित्य संमेलन
पणजी : मिनेझिस ब्रागांझा संस्था, युनियन बँक आॅफ इंडिया व माधव राघव प्रकाशन, ताळगावतर्फे येत्या शनिवारी एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी व गीतकार डॉ. दासू वैद्य असतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
संमेलन येथील मिनेझिस ब्रागांझा संस्था सभागृहात होईल. सकाळी ९.३0 वाजता मिनेझिस ब्रागांझा परिसरात ग्रंथ दिंडी काढण्यात येईल. सकाळी १0 वाजता प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. या वेळी स्वागताध्यक्ष उद्योजक गुरुदास नाटेकर, विशेष निमंत्रित युनियन बँक आॅफ इंडियाच्या विभागीय अधिकारी सुलभा कोरे, विशेष निमंत्रित उद्योजिका आशा आरोंदेकर, मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष संजय हरमलकर व संमेलन संयोजिका चित्रा क्षीरसागर उपस्थित असतील, असे प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी सांगितले. उद्घाटन सत्रानंतर सकाळी ११.३0 वाजता ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे का?’ या विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक असतील. या परिसंवादात संपादक परेश प्रभू, सचिन परब, पर्यावरणवादी प्रा. पौर्णिमा केरकर, सामाजिक कार्यकर्ते अॅड. यतीश नाईक व डॉ. बसवेश्वर चेणगे मते व्यक्त करतील.
दुसऱ्या सत्रात दुपारी २.३0 वाजता ‘शिक्षण क्षेत्रात मराठी भाषेचे महत्त्व आणि स्थान’ या विषयावरील चर्चासत्र होईल.
यात मराठीप्रेमी गो. रा. ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. विनय बापट, प्रा. डॉ. स्नेहा म्हांबरे, प्रा. रामदास केळकर सहभागी होतील. तिसऱ्या सत्रात ‘काव्यबहार’ नावाने निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. मुंबई येथील कवी शशिकांत तिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र व गोव्यातील कवींचे कविता वाचन होईल, अशी माहिती चित्रा क्षीरसागर यांनी दिली. या वेळी उद्योजक गुरुदास नाटेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)