म्हापशात अग्नितांडव
By Admin | Updated: October 24, 2015 03:00 IST2015-10-24T02:52:09+5:302015-10-24T03:00:21+5:30
बार्देस : म्हापसा पालिका बाजारपेठेतील तीन दुकानांना शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागून सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
म्हापशात अग्नितांडव
बार्देस : म्हापसा पालिका बाजारपेठेतील तीन दुकानांना शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागून सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले. कॅफे धाकुली हॉटेलमधील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन हॉटेल जळून खाक झाले. या हॉटेलच्या भिंती तेवढ्या शिल्लक राहिल्या. आगीवर नियंत्रण आणताना अग्निशामक दलाचे तीन जवान जखमी झाले असून दोघांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले, तर एकाला उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला कॅफे धाकुली या हॉटेलमध्ये पहाटे साडेतीन वाजता आग लागली. या वेळी हॉटेलमध्ये गॅसचे पाच सिलिंडर होते. त्यातील एका सिलिंडरचा स्फोट झाल्याने हॉटेलच्या छपराचे पत्रे उंच उडाले आणि ते जवळच असलेल्या सुहास दिवकर यांच्या दोरखंड व प्लास्टिकच्या दुकानावर जाऊन पडल्याने त्यांच्याही दुकानातील माल मोठ्या प्रमाणात जळाला. त्यामुळे त्यांचे ५ लाखांचे नुकसान झाले. कॅफे धाकुलीच्या बाजूला असलेल्या कॅफे एस. एस. झेवियर या बार आणि रेस्टॉरंटला आग लागून चार वातानुकूलन यंत्रे, छप्पर तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्याने १० लाखांचे नुकसान झाले, अशी माहिती या रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने दिली. कॅफे धाकुली या हॉटेलचे मालक लक्ष्मीदास धाकुली यांनी दीड वर्षांपूर्वी या हॉटेलचे नूतनीकरण करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते.
आग लागल्याची माहिती म्हापसा अग्निशामक दलाला मिळताच दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव तसेच जवान अशोक परब, ज्ञानेश्वर सावंत, हनुमंत मापारी, विठ्ठल गाड, प्रमोद गवंडी, महेश नाईक, संदीप गावस, दिप्तेश पै, शिवाजी राणे, सिद्धेश नाईक, तर पणजी येथील मुख्य अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीकृष्ण पर्रीकर, दलाचे जवान विनायक फडते, आग्नेल रॉड्रिग्स, डी. एल. बाबरेकर, योगेश आमोणकर, एम. शेख, आवेश नाईक, मनोज गावकर, आंतोनियो मोनीस, दत्ताराम देसाई, नारायण मोर्लेकर, मनोज नाईक, मंजूनाथ हन्सीमणी, पिळर्ण अग्निशामक दलाचे अधिकारी अनिल तळर्णकर, सूरज शेटगावकर, उमेश नेमळेकर, एस. के. पाटील, जी. एस. नाईक, एच. पी. परब, के. जी. सावंत यांनी पाच पाण्याच्या बंबमधून २८ हजार लिटर पाणी व फायर हायड्रंटमधील पाण्याचा वापर करून आग विझविण्यात आली.
पहाटे आग लागल्याचे कळताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. समाजकार्यकर्ते रामदास फळारी यांनी सांगितले की, म्हापसा पालिका क्षेत्रात विजेच्या खांबावर वाहिन्या अस्ताव्यस्त स्थितीत आहेत. याकडे वीज कार्यालयाचे लक्ष नाही. तसेच दुकानांच्या बाजूनेही वीजवाहिन्यांची गर्दी झाली आहे. परप्रांतीय व्यापारी रस्त्यावर बसत असल्याने आग लागल्यावर अग्निशामक दलाची गाडी नेण्यास वाट मिळत नाही.
घनश्याम शेटगावकर यांनी सांगितले की, पालिकेचे लक्ष नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.
अॅड. महेश राणे यांनी सांगितले की, पालिकेचे बाजारपेठेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. म्हापशातील व्यापाऱ्यांनीही गांभीर्य ओळखायला हवे. सध्या म्हापसा हे स्थानिकांसाठी नसून परप्रांतीयासाठी असल्याच्या भावनेने कोणीच लक्ष देत नसल्याची टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)