मंगळसूत्र चोरणारी टोळी म्हापशात जेरबंद
By Admin | Updated: April 12, 2015 01:10 IST2015-04-12T01:10:46+5:302015-04-12T01:10:46+5:30
बार्देस : पेडे-म्हापसा येथील जिल्हा इस्पितळाच्या औषधालयामध्ये औषधे विकत घेताना वासंती वासुदेव राठवड या ६५ वर्षीय महिलेचे

मंगळसूत्र चोरणारी टोळी म्हापशात जेरबंद
बार्देस : पेडे-म्हापसा येथील जिल्हा इस्पितळाच्या औषधालयामध्ये औषधे विकत घेताना वासंती वासुदेव राठवड या ६५ वर्षीय महिलेचे मंगळसूत्र लांबवणारी पाच महिलांची टोळी अमिता येंडे या महिलेच्या समयसूचकतेमुळे रंगेहाथ पकडली गेली. म्हापसा पोलिसांनी या पाचही संशयित महिलांना अटक केली. ही आंतरराज्य टोळी असावी, असा कयास पालिसांनी व्यक्त केला आहे.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी
१ वाजण्याच्या सुमारास घडली. वासंती राठवड या आपली मुलगी अमिता येंडे व दोन नातवंडांना घेऊन या फार्मसीमध्ये औषधे घ्यायला गेल्या होत्या. औषधे घेत असताना पाच महिला त्यांच्याजवळ आल्या. वासंती यांच्या नकळत त्यांना घेराव घातला व त्यांनीही फार्मसीतून काही औषधे खरेदी केली. फार्मसीवाल्याला एक हजार रुपयांची नोट देऊन शिल्लक पैसे घेतले. या दरम्यान एकीने वासंती यांच्या गळ्याभोवती शिताफीने ओढणी टाकून अलगद कटरने सुमारे ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबविले.
दरम्यान, वासंती यांची मुलगी अमिता येंडे हिने आपल्या आईच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नसल्याचे आईला सांगितले. हे मंगळसूत्र त्या पाच महिलांनीच लांबवले असावे, असा तर्क करून अमिता त्यांच्याकडे गेली व फार्मसीवाल्याकडे तुमचे पैसे राहिल्याचे सांगितले. पैसे परत घेण्यासाठी त्या पुन्हा फार्मसीकडे आल्या, त्या वेळी त्यांच्या हातातील लांबविलेले मंगळसूत्र खाली पडले. अमिताने ते पाहिले व त्वरित उचलून आरडाओरडा केला. त्या वेळी चोरट्या महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथील लोकांनी त्यांना पकडून ठेवले.
संशयितांची नावे गायत्री गणेश (वय २०), वसता पद्मा (वय ४०), बसंती राजू (वय ३३), लक्ष्मी अभिमन्यू (वय २९), शांती शिवा कार्शी (वय ३३) आहेत. तपासावेळी पोलिसांना चकविण्यासाठी अनेक क्लृप्त्या त्यांनी वापरल्या. त्यामुळे या महिला सराईत असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी हवालदार दयानंद साळगावकर तपास करीत आहेत. या कारवाईत सुशांती गोजेकर, प्रतीक्षा पेडणेकर, गीता पालयेकर व इतर महिला पोलिसांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)