विद्वेषी भाजपला महाआघाडीचाच पर्याय

By Admin | Updated: November 10, 2015 01:36 IST2015-11-10T01:36:03+5:302015-11-10T01:36:17+5:30

मडगाव : बिहारच्या धर्तीवर गोव्यातही महाआघाडी या घोषणेचे राज्यात स्वागत केले जात आहे. या महाआघाडीत काँग्रेस पक्षानेही

Mallya BJP is the only choice of a great ally | विद्वेषी भाजपला महाआघाडीचाच पर्याय

विद्वेषी भाजपला महाआघाडीचाच पर्याय

मडगाव : बिहारच्या धर्तीवर गोव्यातही महाआघाडी या घोषणेचे राज्यात स्वागत केले जात आहे. या महाआघाडीत काँग्रेस पक्षानेही
सामील व्हावे, अशी इच्छा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट न करता मौन बाळगणेच पसंत केले आहे.
मागच्या आठवड्यात ‘गोवा फॉरवर्ड’ ही संकल्पना पुढे आणणारे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी बिहारच्या धर्तीवर गोव्यातही भाजपसारख्या धार्मिक विद्वेष पसरविणाऱ्या पक्षाला दूर ठेवण्यासाठी महाआघाडीची गरज व्यक्त
केली होती.
राज्यासाठी एकत्र या : सरदेसाई
यासंबंधी सरदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले, भाजपसारख्या सांप्रदायिक पक्षाला दूर ठेवण्यासाठी अशा महाआघाडीची गोव्याला नितांत गरज आहे. बिहारातील महाआघाडीचा विजय म्हणजे निधर्मी व लोकशाही तत्त्वाचा विजय आहे. भारताची घडण अशीच व्हावी, असे काँग्रेसचे नेते महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल आदी नेत्यांना वाटत होते. त्यांचे ते स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोव्यातील काँग्रेस नेत्यांनी आपले राजकारण बाजूला ठेवून राज्याच्या भवितव्यासाठी अशा महाआघाडीत सामील होणे गरजेचे आहे.
सरदेसाई म्हणाले, गोव्यातील काँग्रेसने बिहारातील निर्णय येथेही अंमलात आणण्याची गरज आहे. भाजपसारख्या सांप्रदायिक पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी बिहारात काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना साथ
दिली. गोव्यातही या पक्षाने प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेण्याची गरज आहे. सध्या ही काळाची गरज बनली आहे.
काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात : कुतिन्हो
राजकीय विश्लेषक व कायदा आयोगाचे माजी सदस्य अ‍ॅड. क्लिओफात कुतिन्हो यांनीही अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, एक काळ असा होता की, देशात काँग्रेस हा मुख्य पक्ष होता आणि काँग्रेसला हटविण्यासाठी सर्व पक्ष एकत्र यायचे. काँग्रेसला हटविण्यासाठी भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी
यांनी १३ पक्ष एकत्र आणले होते.
आज काळ बदलला आहे. देशात व राज्यात सध्या भाजप हा प्रमुख पक्ष बनला आहे. या पक्षाला दूर करायचे असेल तर सर्व बिगर भाजप पक्षांची आघाडी होणे आवश्यक आहे. गोव्यात काँग्रेस पक्ष सध्या अस्तित्वात नसल्यासारखाच आहे. अशा परिस्थितीत जर प्रादेशिक आघाडी उभी होत असेल तर काँग्रेसने या आघाडीत सामील होणे हे या पक्षासाठीही राजकीय शहाणपण ठरेल.
भाजपाला हाकला : व्हिएगस
युगोडेपाचे महासचिव आनाक्लेत व्हिएगस यांनीही सध्या गोव्यात भाजपविरोधात स्थिती निर्माण झाली आहे. या पक्षाला सत्तेवरून हाकलण्यासाठी अगदी योग्यवेळ आली आहे. अशावेळी भाजपविरोधी पक्षांची आघाडी निर्माण झाल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र,
या आघाडीत काँग्रेसला स्थान द्यावे
की नाही यावर विचार व्हायला हवा, असे सांगितले.
दरम्यान, २0१७ च्या निवडणुकीत नवीन व होतकरू चेहरे पुढे यावेत यासाठी ‘गोवा फॉरवर्ड’ अशी संकल्पना विजय सरदेसाई यांनी मांडली आहे याकडेही सध्या राजकीय क्षेत्रात गांभीर्याने पाहिले जाते. एक वेगळा पर्याय या दृष्टीतून या घोषणेकडे पाहिले जात असून कित्येक ठिकाणी नवीन नेतृत्व यामुळे पुढे येऊ शकते, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या संकल्पनेकडे नवीन होतकरू उमेदवारांनीही सकारात्मकतेने पाहणे सुरू केले आहे.
सध्या चर्चेत असलेले आणि नवीन उमेदवार म्हणून पाहिले जाणारे राजेश वेरेकर यांनी यासंबंधात नवीन चेहरे पुढे आल्यास जनतेकडून त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, बिहारमध्ये नितीशकुमार व लालू प्रसाद यांनी जसे एकत्रित प्रयत्न केले तशा प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. यासाठी आतापासूनच तयारी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मडगाव पालिका निवडणुकीत फातोर्डातून ११ नवीन चेहरे लोकांसमोर ठेवून त्या सर्वांना निवडून आणण्याची किमया सरदेसाई यांनी साध्य केली होती. हाच प्रयोग आता संपूर्ण गोव्यात राबविण्याचा मानस सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे. यासाठी समविचारी व्यक्तींना एका व्यासपीठावर आणण्याचीही तयारी त्यांनी दाखविली आहे. फोंड्यातून राजेश वेरेकर, सांगेतून प्रसाद गावकर, साळगावातून जयेश साळगावकर, नुवेतून विन्सेंट रॉड्रिग्स यांसारखे उमेदवार २0१७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत असताना सरदेसाई यांच्या या घोषणेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
यासंदर्भात सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, फातोर्डात आम्ही नवीन चेहऱ्यांचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. गोव्यातही तो यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे. फातोर्डात उमेदवार निवडताना आम्ही कसलीही तडजोड केली नव्हती त्यामुळेच आम्हाला एवढे प्रचंड यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतही अशी तडजोड न करता उमेदवार उभे केले तर लोकांकडून निश्चितच त्याला प्रतिसाद मिळेल, असे ते म्हणाले.
नुवे मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले विन्सेंट रॉड्रिग्स यांच्याशी संपर्क साधला असता, विजय सरदेसाई हे धडाडीचे नेते आहेत. आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याची धमक त्यांच्यात आहे. त्यांनी हा प्रयोग गोव्यात राबविल्यास त्याला निश्चितच पाठिंबा मिळेल, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: Mallya BJP is the only choice of a great ally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.