लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी: २०३७ पर्यंत खऱ्या अर्थाने विकसित गोव्याचा पाया फक्त शिक्षणच रचू शकते. राज्यातील उच्चशिक्षण संस्था उत्कृष्टता, कौशल्य आणि नवोपक्रमाची केंद्रे बनली पाहिजेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
उच्चशिक्षण संचालनालयाच्या वतीने ओल्ड गोवा येथे आयोजित 'उच्चशिक्षण: ज्ञान अर्थव्यवस्था' या विषयावर केंद्रित असलेल्या 'विकसित भारत २०४७ साठी मानवी भांडवल' या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उच्चशिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, गोवा राज्य उच्च शिक्षण परिषदेचे प्रो. विठ्ठल तिळवी, प्रो. नियॉन मार्शन, डॉ. महेश माजिक आदी मान्यवर उपस्थित होते. गोव्याच्या उच्चशिक्षण आराखड्याला विकासाच्या व्यापक राष्ट्रीय उद्दिष्टांशी जोडण्यासाठी या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या 'मुख्य सचिवांची पाचवी परिषद २०२५'च्या अनुषंगाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. गोवा राज्य उच्चशिक्षण परिषदेचे प्रो. नियॉन मार्शेन यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर प्रो. विठ्ठल तिळवी यांनी कार्यक्रमाची रूपरेखा सादर केली. डॉ. तन्वी कामत बांबोळकर यांनी सूत्रसंचालन तर संचालक भूषण सावईकर यांनी आभार मानले.
कुशल मनुष्यबळासाठी रोजगारक्षम केंद्रित शिक्षणाला प्रोत्साहन द्या
डिजिटल शिक्षणावर भर, कुशल शिक्षक, आधुनिक अध्यापनशास्त्र, आणि मजबूत संशोधन संस्कृती निर्माणीकरणाच्या माध्यमातून ज्ञानाची निर्मिती आणि प्रसार केला पाहिजे. अभ्यासक्रम, आधुनिकीकरण, प्राध्यापक क्षमता बांधणी आणि दर्जेदार शिक्षणासाठी समावेशक प्रवेश या घटकांच्या आधारे ज्ञानाची उपयुक्तता अधोरेखित व्हावी. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी रोजगारक्षम केंद्रित शिक्षणाला प्रोत्साहन द्यायला हवे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
संशोधन, नवोपक्रमांना संस्कृती बनवा : भूषण सावईकर
राज्यातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये आपण संशोधन आणि नवोपक्रमांना 'संस्कृती' बनवले पाहिजे. गोवा, आधुनिक, समावेशक आणि भविष्याभिमुख शिक्षणाचे केंद्र बनू द्या, असे उद्गार संचालक भूषण सावईकर यांनी काढले.