महायुतीस कॉँग्रेस अनुकूल

By Admin | Updated: November 15, 2015 01:41 IST2015-11-15T01:41:20+5:302015-11-15T01:41:30+5:30

मडगाव : कॉँग्रेस पक्ष महायुतीच्या विरोधात नाही; मात्र गोवा प्रदेश कॉँग्रेस भाजपशी संधान बांधलेल्या व भाजपची बी टीम

Mahayuti Congress friendly | महायुतीस कॉँग्रेस अनुकूल

महायुतीस कॉँग्रेस अनुकूल

मडगाव : कॉँग्रेस पक्ष महायुतीच्या विरोधात नाही; मात्र गोवा प्रदेश कॉँग्रेस भाजपशी संधान बांधलेल्या व भाजपची बी टीम असलेल्या पक्षांशी तसेच अपक्षांशी महायुती करणार नाही. कॉँग्रेस गोव्यातील धर्मनिरपेक्ष लोकांशी महायुती करून येणाऱ्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देण्यास सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन गोवा प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी शनिवारी येथे केले.
येथे कॉँग्रेसने आयोजिलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात सहिष्णुतेची शपथ या सभेत घेण्यात आली. या वेळी व्यासपीठावर लुईझिन फालेरो, फ्रान्सिस सार्दिन, रवी नाईक, प्रतापसिंग राणे व दिगंबर कामत हे कॉँग्रेसचे पाच माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. तसेच खासदार शांताराम नाईक, आमदार चंद्रकांत कवळेकर, पांडुरंग मडकईकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, माजी आमदार फिलीप नेरी रॉड्रिगीस, मोती देसाई, सुभाष फळदेसाई आदी मान्यवरही उपस्थित होते.
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष किमान पन्नास टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. निवडणुकीत उतरण्यास तयार असलेल्यांनी लोकसंपर्क साधून आपली शक्ती सिद्ध करावी, असे फालेरो यांनी सांगितले. जुन्याजाणत्यांनी पक्षात नवी जान फुंकण्यास मदत करावी, असे फालेरो म्हणाले. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आपल्याकडे जादूची छडी नाही; मात्र सर्वांनी एकत्रित काम केल्यास भाजपची मक्तेदारी आपण सहज तोडू शकतो. गोव्यात व भारतात असहिष्णुता वाढीस लागण्यास भाजपचे सरकार जबाबदार आहे. परदेशात जाऊन महात्मा गांधींच्या शांतीचा उपदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात मात्र मौनव्रत घेऊन बसल्याची टीका फालेरो यांनी केली.
भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे खाण उद्योगात असलेल्या सुमारे नव्वद हजार लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. भाजपने राज्यातील लोकांची फसवणूक केलेली आहे. या राज्यातील प्रत्येक माणसावर सुमारे एक लाखाचे कर्ज काढून भाजप राज्य चालवीत असल्याची टीका फालेरो यांनी केली. गोव्याची व देशाची आर्थिक स्थिती दयनीय झालेली असून देशाला व राज्याला वाचविण्यासाठी मतदारांनी आपल्या चुकीची दुरुस्ती करून कॉँग्रेसला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन फालेरो यांनी केले.
विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे म्हणाले की रात्र वैऱ्याची आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन खोटारडेपणाने सत्ता हासील केलेल्यांना हरविण्याची वेळ आलेली आहे. लोकपाल, लोकायुक्तसाठी छाती पिटणारे आता गप्प का?
भाजप सरकारने कुंभकर्णाची झोप घेतलेली असून दक्षिण गोव्यातील लोकहितार्थ आपण सुरू केलेले जिल्हा इस्पितळ प्रकल्प, कदंब वाहतूक प्लाझा व गैरपारंपरिक ऊर्जा प्लाझा सारखे प्रकल्प भाजप सरकारने शीतपेटीत टाकल्याचा आरोप मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केला. गोमंतकीयांमधे असलेली ठिणगी पेटविण्याची वेळ आलेली आहे. लोकविरोधी सरकारला घरी पाठविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा द्यावा, असे आवाहन कामत यांनी केले. या वेळी बाबू आजगावकर व इतरांचीही भाषणे झाली. कॉँग्रेस पक्षाने असहिष्णुतेच्या विरोधात शपथ घेतली. विकासाच्या विरोधात असलेल्या असहिष्णुतेच्या विरोधात लढा देण्याची व गोव्याच्या संस्कृतीच्या व मूल्यांच्या रक्षणासाठी लढा देण्याची शपथ या वेळी घेण्यात
आली.
(प्रतिनिधी)

Web Title: Mahayuti Congress friendly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.