मडकईकरांची ‘एसीबी’कडून चौकशी
By Admin | Updated: July 24, 2014 01:27 IST2014-07-24T01:25:25+5:302014-07-24T01:27:33+5:30
पणजी : पोलीस स्थानकासाठी संपादन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली जमीन विकत घेण्याच्या प्रकाराबद्दल आमदार पांडुरंग मडकईकर यांची सीबीआयकडून

मडकईकरांची ‘एसीबी’कडून चौकशी
पणजी : पोलीस स्थानकासाठी संपादन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली जमीन विकत घेण्याच्या प्रकाराबद्दल आमदार पांडुरंग मडकईकर यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.
जुने गोवे परिसरात आॅगस्ट २००४ साली पोलीस स्थानक बांधण्यासाठी मडकईकर यांनी ५ हजार चौरस मीटर जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिला होता. ती जमीन अनंत शेणवी धुमे या नागरिकाची होती. हा प्रस्ताव सात दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला होता. आज तीच जमीन १ /१४च्या उताऱ्यात मडकईकर रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची असल्याचे दाखविण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जी जमीन आमदार आपण स्वत:हून मुख्यमंत्र्यांना एखाद्या सार्वजनिक प्रकल्पासाठी दाखवितात आणि कालांतराने ती मूळ मालकाकडून आपणच विकत
घेतात, या प्रकारात भ्रष्टाचाराचा संशय
येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
त्यामुळे या प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून चौकशी करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी हस्तक्षेप करून सरकारवरच टीका करताना, प्रकल्पासाठी राखून ठेवलेली जमीन १० वर्षे अधिसूचित का करण्यात आली नाही, असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, तेव्हा आपले सरकार कोसळले होते. त्यानंतरच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगून प्रतिहल्ला चढविला.
हा मुद्दा मडकईकर यांनीच प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला होता. (प्रतिनिधी)