मडगाव, कुंकळ्ळी, काणकोण, पेडणेला आता महिला नगराध्यक्ष
By Admin | Updated: July 15, 2015 01:44 IST2015-07-15T01:43:56+5:302015-07-15T01:44:28+5:30
पणजी : सरकारच्या पालिका प्रशासन खात्याने पेडणे, मडगाव, काणकोण व कुंकळ्ळी या पालिकांचे नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित केले आहे.

मडगाव, कुंकळ्ळी, काणकोण, पेडणेला आता महिला नगराध्यक्ष
पणजी : सरकारच्या पालिका प्रशासन खात्याने पेडणे, मडगाव, काणकोण व कुंकळ्ळी या पालिकांचे नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित केले आहे.
सध्या साखळी, डिचोली, मुरगाव, कुडचडे आणि फोंडा या पालिकांचे नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित आहे. तथापि, आता आॅक्टोबरमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर साखळी, डिचोली, मुरगाव व कुडचडे या पालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी असलेले महिला आरक्षण रद्द होईल. त्याऐवजी फिरत्या पद्धतीने पेडणे, मडगाव, काणकोण व कुंकळ्ळी पालिकेच्या नगराध्यक्षपदी महिला नगरसेवक पाहायला मिळतील. तशी तरतूद पालिका प्रशासन खात्याने केली आहे.
मामलेदारांमार्फत सध्या प्रभागांची फेररचना करून घेतली जात आहे. म्हणजे प्रत्येक प्रभागात समान मतदारसंख्या असावी असा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी पंचायत खात्याने भाजपच्या विरोधातील उमेदवारांची अडचण होईल, अशा पद्धतीने प्रभाग फेररचना व आरक्षण केले होते. तो मोठ्या वादाचा विषय ठरला होता. त्याच धर्तीवर सध्या पालिका प्रभागांची फेररचना काही ठिकाणी सुरू असल्याची चर्चा विरोधी पक्षाशी संबंधित विद्यमान नगरसेवकांमध्ये आहे. सरकारमधील काही मंत्री, आमदार आॅक्टोबरमधील निवडणुकांनंतरही पालिका आपल्या समर्थकांच्या हाती राहाव्यात म्हणून प्रयत्न करत आहेत. आॅगस्टपासून निवडणूक आयोग सक्रिय होणार आहे. (खास प्रतिनिधी)