लुईझिन फालेरो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
By Admin | Updated: October 8, 2014 01:28 IST2014-10-08T01:25:49+5:302014-10-08T01:28:08+5:30
पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी अखेर लुईझिन फालेरो यांची नियुक्ती झाली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी

लुईझिन फालेरो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी अखेर लुईझिन फालेरो यांची नियुक्ती झाली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांना कल्पना न देता फालेरो यांच्या नियुक्तीस मान्यता दिली. यामुळे पक्ष नव्याने बांधण्यासाठी विद्यमान प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी चालविलेला संघर्ष संपुष्टात आला.
अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी ही घोषणा केली. राज्यसभेचे माजी खासदार जॉन फर्नांडिस यांची दहा महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. लोकसभा निवडणुकीवेळी ज्यांनी पक्षासाठी काम केले नाही व ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्याविरुद्ध फर्नांडिस यांनी कारवाईची मोहीम सुरू केली होती. त्याच विषयावरून पक्षातील काही नेते दुखावले गेले. त्यांनी फर्नांडिस यांना प्रदेशाध्यक्षपदावरून काढावे म्हणून प्रयत्न सुरू केले होते. भालचंद्र नाईक यांच्या खाणीच्या विषयावरून तर विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे आणि जॉन यांच्यात मोठा वाद पेटला व हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर राणे यांनी जॉनविरुद्ध सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली होती. जॉन यांच्याशी राणे यांनी असहकारच पुकारला होता व पक्ष जोपर्यंत त्यांना काढत नाही, तोपर्यंत आपण काँग्रेस हाउसमध्ये येणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
जॉन यांनी मध्यंतरी दिग्विजय सिंग यांची परवानगी घेऊन काँग्रेसच्या सगळ्या गट समित्या बरखास्त केल्या व नव्याने समित्या नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ती प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच फर्नांडिस यांना पदावरून काढण्याबाबतची फाईल गांधी यांनी मंजूर केली. स्वत: फालेरो हेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनण्यासाठी इच्छुक होते. त्यांची इच्छा पूर्ण झाली. फालेरो हे दहा वर्षांपूर्वीही राज्यात पर्रीकर सरकार असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. आपल्याला पदावरून बाजूला करण्यात आल्याची कल्पना फर्नांडिस यांना आली. आपल्याला पक्षाने अधिकृतरीत्या सांगितलेले नाही; पण फालेरो यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची माहिती आपल्याला दिल्लीहून मिळाली आहे, असे फर्नांडिस यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (खास प्रतिनिधी)