दक्षिण गोव्यात कमळ की हात?
By Admin | Updated: May 16, 2014 01:06 IST2014-05-16T01:02:33+5:302014-05-16T01:06:28+5:30
मडगाव : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला दक्षिण गोवा आपल्याकडेच राखून ठेवण्यात काँग्रेसला यश येते की, या मतदारसंघात भाजपा बाजू मारते, याचा फैसला शुक्रवारी होणार

दक्षिण गोव्यात कमळ की हात?
मडगाव : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला दक्षिण गोवा आपल्याकडेच राखून ठेवण्यात काँग्रेसला यश येते की, या मतदारसंघात भाजपा बाजू मारते, याचा फैसला शुक्रवारी होणार असून, दक्षिण गोव्यात ‘हात’ की ‘कमळ’ यावर दुपारी दोन वाजेपर्यंत शिक्कामोर्तब होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणी सुरू होण्यास काही तास बाकी असताना काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. काँग्रेसचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आपण किमान दहा हजार मतांच्या आघाडीने जिंकून येऊ, असा विश्वास व्यक्त केला. सासष्टीत मोठ्या प्रमाणात झालेले मतदान काँग्रेसच्याच पथ्यावर पडेल, असा दावा त्यांनी केला, तर भाजपाचे नरेंद्र सावईकर यांनी आपण सहज जिंकू, असा दावा केला. सासष्टीतही भाजपाला चांगल्या प्रकारे मते पडतील, असा दावा त्यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार चर्चिल आलेमाव यांनीही आपल्याला बर्यापैकी मते पडतील, असा दावा केला आहे. यंदाच्या निवडणुकीत दक्षिण गोव्यातून तब्बल बारा उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात काँग्रेसचे रेजिनाल्ड लॉरेन्स, भाजपाचे नरेंद्र साईवकर, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राजू मंगेशकर, बहुजन मुक्ती पार्टीचे क्लिप्टन डिसोझा, तृणमूल काँग्रेसचे चर्चिल आलेमाव, ‘आप’च्या स्वाती केरकर, गोवा सुराज पार्टीचे सावियो रॉड्रिगीस, तर जवाहर डायस, गोविंद गावडे, बाळकृष्ण साळगावकर, व्हिनस हबीब व शालोम सार्दिन या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. रेजिनाल्ड यांनी आपण ‘सायलंट व्होटिंग’च्या आधारे जिंकून येऊ, असा दावा केला असला, तरी भाजपापासून कोणीही विजय हिरावून घेऊ शकणार नाही, असा दावा सावईकर यांनी केला. आतापर्यंत दक्षिण गोव्यातून केवळ एकदाच भाजपा विजयी झाला आहे. १९९९ साली भाजपाचे रमाकांत आंगले यांनी काँग्रेसचे जोकिम आलेमाव यांच्यावर १४,४१९ मतांच्या आघडीने विजय मिळविला होता. हा अपवाद वगळता आजपर्यंत परंपरेने दक्षिण गोवा काँगे्रसकडे राहिला आहे. २00९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नरेंद्र सावईकर यांनी काँग्रेसला चांगली टक्कर दिली होती. मात्र, त्यांना त्या वेळी १२,०१६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांना १,२७,४९४, तर सावईकर यांना १,१४,९७८ मते मिळाली होती. मडगावच्या दामोदर वाणिज्य महाविद्यालय संकुलात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. सुरुवातीला टपालाद्वारे आलेल्या मतांची मोजणी, नंतर मतयंत्रातील मतांची मोजणी होणार आहे. एकूण दहा दालनांत ही मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक अधिकारी असलेले दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दामोदर महाविद्यालय व कारे महाविद्यालय अशा दोन ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. कारे महाविद्यालयात पहिल्या टप्प्यात सांगे, मुरगाव, वास्को, केपे, शिरोडा व काणकोण व दुसर्या टप्प्यात सावर्डे, कुठ्ठाळी, दाबोळी, कुडचडे, मडकई व फोंडा या मतदारसंघांतील मतांची मोजणी हाती घेणार आहेत, तर दामोदर महाविद्यालयात पहिल्या टप्यात नुवे, कुडतरी, फातोर्डा व बाणावली, तर दुसर्या टप्प्यात वेळ्ळी, कुंकळ्ळी, मडगाव व नावेली या मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)