पर्रीकरांच्या वाढदिनासाठी लगबग
By Admin | Updated: November 29, 2015 01:59 IST2015-11-29T01:58:58+5:302015-11-29T01:59:09+5:30
पणजी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वाढदिन सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सरकार आणि भारतीय जनता पक्ष

पर्रीकरांच्या वाढदिनासाठी लगबग
पणजी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वाढदिन सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सरकार आणि भारतीय जनता पक्ष मिळून करत आहे. राज्यभर भाजपच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. वाढदिन सोहळ्यानिमित्त भाजप कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर होईल व त्यांच्यात नव्याने चैतन्य निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी येथे व्यक्त
केला.
सत्कार समितीच्या आयोजन समितीची मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बैठक घेऊन तयारी कुठवर पोहोचली आहे, याचा आढावा घेतला. आम्ही येत्या १३ डिसेंबर रोजी कांपाल येथे मोठी गर्दी जमवू. पर्रीकरांच्या वाढदिन सोहळ्यानिमित्त भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. गेल्या साडेतीन वर्षांच्या सत्ताकाळात जर संघटनात्मक पातळीवर कुठे मरगळ आलेली असेल, तर ती आता जाईल. सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या बैठका सुरू आहेत. येत्या १३ रोजी गर्दी जमविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. पर्रीकर हे वयाची ६0 वर्षे येत्या १३ रोजी पूर्ण करत असल्याने हा सत्कार आहे. पुढील वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने पर्रीकरांचा सत्कार सोहळा हा त्या दृष्टीनेही उपयुक्त ठरेल, असे पार्सेकर म्हणाले.
दरम्यान, या सत्कार सोहळ्यावर सरकार खर्च
करत नाही. १३५ सदस्यांची आयोजन समिती मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी नेमली आहे. त्या समितीवर भाजपच्या नेत्यांसह ‘मगो’चे मंत्री व सत्ताधारी आघाडीतील अन्य पक्षांचेही आमदार आहेत. तसेच दोन उद्योगपतीही आहेत. पर्रीकरांच्या सत्कारानिमित्त होणारी सभा ही एकप्रकारे पुढील विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडणारीच ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. (खास प्रतिनिधी)