लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'लोकमत' समूहाने फक्त पत्रकारितेतच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. एक चांगले दैनिक म्हणून महाराष्ट्र, गोवा व देशातील इतर भागांत वेगळा ठसा उमटवला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
काल, बुधवारी पणजी येथील हॉटेल मॅरियटमध्ये 'लोकमत'तर्फे आयोजित 'गोवन ऑफ द इयर २०२५'च्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांना सावंत यांच्या हस्ते 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार दिगंबर कामत व उद्योगपती अनिल खंवटे, जयेंद्र भाई शाह, लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदिप गुप्ते व संपादक सद्गुरू पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'लोकमत'कडून गोव्यात दर्जेदार बातम्या मिळतातच, शिवाय सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमही राबविले जातात, ही कौतुकास्पद बाब आहे. 'लोकमत सखी मंच'च्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक तालुक्यातून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे ही खूपच उल्लेखनीय बाब आहे. 'गोवन ऑफ द इयर २०२५' पुरस्काराने समाजातील विविध क्षेत्रांतील चांगली कामगिरी बजावलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जात आहे हीदेखील कौतुकास्पद बाब आहे. यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धाही वाढते.
'लोकमत'चे ग्रामीण पत्रकारही चांगले काम करतात. समाजात जागृती निर्माण करण्याचे, तसेच सरकारला जाग आणण्याचे काम हे पत्रकार करत असतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुदार यसो गावकर याने गणेश वंदना सादर केली. संपादक सद्गुरू पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले, तर आभार लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदिप गुप्ते यांनी मानले.
'लोकमत' ही एक चळवळ : विजय दर्डा
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा म्हणाले की, लोकमत हे केवळ वर्तमानपत्रच नव्हे, तर एक चळवळ आहे. लोकमतने गोव्यात अल्पकाळात वेगळे स्थान निर्माण केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न, लोकांच्या मूलभूत समस्या या वर्तमानपत्रातून पुढे आणल्या जात आहेत. गोव्याच्या काही महत्त्वाच्या बातम्या आम्ही इतर सर्व आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध करत असतो. गोवा आवृत्तीने सुरू केलेल्या कुजबुजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्ही लोकमतच्या सर्व आवृत्त्यांमध्ये कुजबुज सुरू केली आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या लोकांचा गौरव करून लोकमत त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती देत आहे.
'लोकमत'ने माझ्या कामाची दखल घेतली : प्रतापसिंग राणे
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे म्हणाले, अनेक वर्षे गोव्याच्या राजकारणात राहिलो. मुख्यमंत्रिपदी असताना गोव्याच्या हिताच्या दृष्टीने जे काही करता आले ते केले. आज राजकारणात सक्रिय नाही. घरी बसून निवांत जीवन जगत आहे. लोकमतने माझ्या कामाची दखल घेऊन मला हा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. मुख्यमंत्र्याने काम केलेच पाहिजे. काम केले नाही, तर मुख्यमंत्रिपद टिकू शकत नाही. जो काम करतो तोच टिकून राहतो.
विविध मान्यवरांचा गौरव
प्रतापसिंह राणे यांनी गोवा विधानसभेत ५० वर्षे प्रतिनिधित्व केले. तसेच, गोव्याचे राजकारण, समाजकारण, कृषी व इतर क्षेत्रांतील अतुलनीय योगदानासाठी त्यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जीवन गौरव पुरस्कारासाठी त्यांची एकमताने निवड करण्यात आली होती.
ज्युरींचा गौरव
यावेळी 'गोवन ऑफ द इयर २०२५' ज्युरी समितीचे अध्यक्ष अनिल खंवटे, दौलत हवालदार, ब्रह्मानंद शंखवाळकर, गोविंद पर्वतकर, प्रवीण सबनीस, डॉ. शकुंतला भरणे यांचा गौरव करण्यात आला.
असे आहेत पुरस्काराचे मानकरी
क्रीडा अनुरा प्रभुदेसाई आरोग्य - डॉ. शिरीष बोरकरप्रशासकीय अधिकारी - भूषण सावईकरकला व संस्कृती - सोनिया शिरसाटशिक्षण - विलास सतरकरपर्यटन - सावनी शेट्येपोलिस अधिकारी - संतोष देसाईरेस्टॉरंट - कॅफे तातो (पणजी)पर्यावरण - चंद्रकांत शिंदे
वुमन अचिव्हर्स अवॉर्ड
'लोकमत सखी मंच' आपला रौप्य महोत्सव साजरा करत असल्याने 'गोवन ऑफ द इयर २०२५' या कार्यक्रमात बारा तालुक्यांतून १२ महिलांना वुमन अचिव्हर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. यामध्ये लीना नाईक तारी (तिसवाडी), श्रद्धा गवंडी (फोंडा), श्रद्धा माशेलकर (पेडणे), स्वीजल प्रावासो (केपे), स्वीजल नाईक (काणकोण), अपर्णा आमोणकर (डिचोली), अंकिता माजिक (सत्तरी), डॉ. हेमली देसाई (सांगे), नियती मळगावकर (बार्देश), अॅड. दिव्या गावकर (धारबांदोडा), डॉ. श्वेता इलकर (मुरगाव), डॉ. तन्वी कामत बांबोळकर (सासष्टी) यांना सन्मानित करण्यात आले.
दशकातील सर्वात यशस्वी नेता म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गौरविण्यात आले.
सक्षम विधिमंडळपटू म्हणून आमदार नीलेश काब्राल यांचा गौरव करण्यात आला.
वरिष्ठ आयएएस अधिकारी म्हणून डॉ. व्ही. कांदावेलू यांचा गौरव करण्यात आला.
पायाभूत सुविधांसाठी अतुलनीय योगदानाबद्दल अतुल भोबे यांचाही गौरव करण्यात आला.
पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल किरण ठाकुरयांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कारांची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने करण्यात आली. प्रत्येक विभागातून नामांकने जाहीर करून लोकांची मते मागवली होती.
महनीय व्यक्तींची उपस्थिती
या सोहळ्याला आजी, माजी मंत्री, आमदार उपस्थित होते. यात जीत आरोलकर, संकल्प आमोणकर, रुदोल्फ फर्नांडिस, केदार नाईक, दिव्या राणे, नीलेश काब्राल, ग्लेन टिकलो, दिलीप परुळेकर, नरेश सावळ, सिद्धार्थ कुंकळयेकर, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सुलक्षणा सावंत, विजया देवी राणे, विश्वधारा डहाणूकर, मुख्य सचिव व्ही. कांदावेलू, अॅटर्नी जनरल देविदास पांगम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.