पर्रीकरांवरील ‘लोकमत’चा ग्रंथ दर्जेदार
By Admin | Updated: December 13, 2015 01:43 IST2015-12-13T01:43:29+5:302015-12-13T01:43:41+5:30
पणजी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर ‘लोकमत’ने काढलेला गौरव ग्रंथ दर्जेदार आहे. ‘लोकमत’ने अनेकदा पर्रीकर

पर्रीकरांवरील ‘लोकमत’चा ग्रंथ दर्जेदार
पणजी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर ‘लोकमत’ने काढलेला गौरव ग्रंथ दर्जेदार आहे. ‘लोकमत’ने अनेकदा पर्रीकर यांच्या कार्यपद्धतीतल्या त्रुटींवर बोट ठेवले असले तरी याच वर्तमानपत्राने त्यांच्या कार्याचा आवाका अणि सच्चेपणा याची दखल घेत त्यांच्यावर आकर्षक गौरव ग्रंथ काढणे हे समयोचितच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.
येथे आयोजित केलेल्या पर्रीकर यांच्या षष्ठ्यब्दिपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर, ‘लोकमत’ गोवा आवृत्तीचे महाव्यवस्थापक संदीप गुप्ते, संपादक राजू नायक उपस्थित होते. गोव्याचा विकास स्वयंपोषक पद्धतीने व्हावा म्हणून ‘लोकमत’ने विधायक टीकाकाराची भूमिका बजावली. राजकीय पक्ष आणि प्रसार माध्यमांनी केवळ लोकानुरंजनाच्या भूमिका घेणे हे चुकीचे आहे. लोकांना काय हवे, यापेक्षा लोकहिताचे काय आहे, हे सांगणे ही वृत्तपत्रांची जबाबदारी असते, असे प्रतिपादन राजू नायक यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले.
मुख्यमंत्री पार्सेकर म्हणाले, मनोहर पर्रीकर यांना स्वत:चे कौतुक करून घेण्याची सवय नाही. स्वत:च्या वाढदिवसाचेही त्यांना अप्रूप नाही; पण त्यांच्या कार्याची दखल घेणे ही पक्षाची आणि सहकाऱ्यांची जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीत पर्रीकर यांचे योगदान खूप मोठे आहे. भाजपची संघटना पर्रीकर यांनी उभी केली आणि त्या संघटनेचा विस्तारही केला. पर्रीकर हे बहुजन समाजात जन्मले नसले
तरी समाजाच्या तळागाळातील लोकांबाबत खूप कणव असलेला नेता, असे त्यांचे वर्णन पार्सेकर यांनी केले. भाजपचे सरकार आतापर्यंत साडेआठ वर्षे सत्तेवर राहिले आणि लोककल्याणाच्या योजना या पर्रीकरांच्याच डोक्यातून जन्माला आल्या.
राज्याच्या आर्थिक प्रतिकूल परिस्थितीतही कोणत्या विकासकामांना प्राधान्य द्यावे आणि कोणत्या योजना सुरूच ठेवाव्यात याचा निर्णय त्यांनी अचूक घेतला. पर्रीकरांचा वारसदार म्हणून आपण राज्याची धुरा पेलत अहे. आपण पर्रीकरांच्या सावलीतून बाहेर आलो नाही, अशी टीका आपल्यावर होते. पर्रीकर आणि मी अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे यात गैर असे काहीच नाही. पर्रीकरांनी राज्याच्या विकासाची वाट आखून दिली असून या मळलेल्या वाटेवर चालणे आपल्याला आवडते, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले. साहाय्यक संपादक अनंत साळकर यांनी आभार मानले. ‘लोकमत’चा ‘मनोहर’ हा अंक ८0 पानांचा आहे. आकर्षक रंगीत छपाई असून त्यात पर्रीकरांच्या बालपणापासून आतापर्यंतची कारकीर्द टिपणारे मान्यवरांचे लेख आणि छायाचित्रे आहेत.
(प्रतिनिधी)