पावसाच्या हलक्या सरी; आजही शक्यता
By Admin | Updated: January 2, 2015 01:12 IST2015-01-02T01:04:58+5:302015-01-02T01:12:04+5:30
पणजी : राज्यात गुरुवारी अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या.

पावसाच्या हलक्या सरी; आजही शक्यता
पणजी : राज्यात गुरुवारी अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या. दुपारपर्यंत सर्वत्र ढगाळ वातावरण होते. काही प्रमाणात लोकांना उष्माही जाणवला. शुक्रवारीही काही भागात ढगाळ वातावरण राहाणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे.
येथील हवामान वेधशाळेचे साहाय्यक संचालक हरिदासन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आंध्र प्रदेशनजीक बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. तसेच गुजरात व मुंबई किनारपट्टी भागात हवेच्या वरच्या थरातही कमी दाबाच्या निर्माण झालेल्या पट्ट्यामुळे त्याचे परिणाम गोव्याच्या हवामानावर झालेले दिसत आहेत.
गुरुवारी अचानक पावसाच्या सरी कोसळल्याने अनेकांची तारांबळ उडाली. पर्वरी, म्हापसा भागात पावसाच्या सरी झाल्यानंतर काही वेळाने सूर्याने दर्शन दिले. त्याआधी ढगाळ वातावरण होते.
बुधवारी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी किनाऱ्यांवर जमलेले पर्यटक तसेच स्थानिकांना ढगाळ वातावरणामुळे सूर्यास्ताचे दर्शन झाले नाही, यामुळे निराश होऊन त्यांना परतावे लागले.
(प्रतिनिधी)