भाषा सुरक्षा मंचातर्फे गुरुवारी पणजीत धरणे
By Admin | Updated: October 6, 2015 01:51 IST2015-10-06T01:50:48+5:302015-10-06T01:51:11+5:30
पणजी : इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करा, ही मागणी पूर्ण करून घेण्यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच आक्रमक बनला असून मंचने उद्या, मंगळवारपासून राज्यभर

भाषा सुरक्षा मंचातर्फे गुरुवारी पणजीत धरणे
पणजी : इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करा, ही मागणी पूर्ण करून घेण्यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच आक्रमक बनला असून मंचने उद्या, मंगळवारपासून राज्यभर बैठकांचे सत्र सुरू करण्याचे ठरविले आहे. तसेच येत्या ८ रोजी पणजीत धरणे आंदोलन करण्याचाही निर्णय मंचने सोमवारी येथे जाहीर केला.
मंचचे नेते प्रा. सुभाष वेलिंगकर, अॅड. उदय भेंब्रे, अरविंद भाटीकर, अनिल सामंत, पुंडलिक नाईक, पांडुरंग नाडकर्णी, नागेश करमली, सुभाष देसाई यांची संयुक्त पत्रकार परिषद येथे पार पडली. इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करा, मराठी-कोकणी शाळांना जाहीर केलेल्या सवलतींची अंमलबजावणी करा आणि ‘फोर्स’ने रास्ता रोको करून यापूर्वी कायदा मोडल्याने त्यांच्यावर कारवाई करा, या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला आम्ही दि. २ आॅक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. पण, सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. परिणामांची पर्वा आम्ही करत नाही, ती सरकारनेच करावी, असा इशारा वेलिंगकर व भेंब्रे यांनी दिला.
भारतीय भाषा सुरक्षा मंच आपल्या विविध तालुक्यांतील समित्या आता सक्रिय करील. मंगळवारपासून तालुकावार बैठका होतील. सरकारी अनुदान हे मराठी-कोकणी शाळांनाच मिळायला हवे. डायोसेझनच्या इंग्रजी शाळांचे अनुदान त्वरित बंद करावे. ते तात्पुरते आहे, असे आम्हाला भाजप सरकारने सांगितले होते. सरकारने दिलेला शब्द पाळावा, असे वेलिंगकर म्हणाले. येत्या महिन्यात चाळीसही आमदारांना त्यांच्या घरी जाऊन भाषा सुरक्षा मंचचे सदस्य भेटतील व इंग्रजी शाळांचे अनुदान का बंद व्हायला हवे, हे त्यांना पटवून देतील.
येत्या ८ रोजी येथील फेरीबोट धक्क्याजवळ दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले जाईल, असे वेलिंगकर यांनी सांगितले. आम्ही यापूर्वी काँग्रेसचे सरकार अधिकारावर असताना ज्या तीव्रतेने आंदोलन केले होते, त्याच तीव्रतेचे आंदोलन या वेळीही करू, असे भेंब्रे यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)