कोकण रेल्वे ठप्प
By Admin | Updated: October 8, 2014 01:28 IST2014-10-08T01:24:58+5:302014-10-08T01:28:14+5:30
चिपळूण/मडगाव : चिपळूण ते वालोपे दरम्यानच्या रेल्वे मार्गावर खेर्डी पुलाजवळ मंगळवारी सकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास रूळ तुटल्याने चाके

कोकण रेल्वे ठप्प
चिपळूण/मडगाव : चिपळूण ते वालोपे दरम्यानच्या रेल्वे मार्गावर खेर्डी पुलाजवळ मंगळवारी सकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास रूळ तुटल्याने चाके निखळून मालगाडीचे ११ डबे घसरले. पाच डबे खाली शेतात कोसळले. या मालगाडीतून गव्हाची वाहतूक केली जात होती. या अपघातामुळे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे मडगाव रेल्वे स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंगळवारी पहाटे कोकणकन्या व राज्यराणी एक्स्प्रेस रत्नागिरीकडे सुरक्षितपणे गेल्या. मात्र, पावणेआठ ते आठच्या दरम्यान चिपळूणनजीकच्या खेर्डी-माळेवाडी पुलाजवळ रूळ तुटला. त्यानंतर मुंबईहून बंगळुरूच्या दिशेने धावणारी मालगाडी येथे आली आणि तिचे ११ डबे घसरले. डब्याची चाके निखळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. या गाडीतून गहू नेला जात होता. सकाळच्या वेळी अचानक रेल्वेचे डबे घसरून खाली आल्याचे अनेकांनी पाहिले आणि बघ्यांची गर्दी झाली. इंजिन काही डब्यांसह पुढे निघून गेले, तर रूळ तुटल्याने दोन डब्यांमधील जोड तुटला. त्यामुळे डबे खाली कोसळले. अपघातानंतर तातडीने पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, साहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, उपनिरीक्षक अविनाश मते, जमादार राजेंद्र देसाई, हवालदार डी. व्ही. विभुते यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले.
या अपघातामुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर कामथे रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली होती, तर मंगला एक्स्प्रेस सावर्डे (रत्नागिरी) रेल्वे स्थानकात उभी होती. या दोन्ही गाड्या परत पाठविण्यात आल्या. या मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. काही गाड्या पुणेमार्गे वळविण्यात आल्या आहेत. खेर्डी येथील रेल्वे पुलाचे ग्रील तुटून पडले असून ट्रॅकखालील खडी खाली कोसळली. रुळांखालचे सिमेंटचे पोल चिरडून गेले, तर लोखंडी रूळ वाकडेतिकडे झाले. काही डब्यांची चाके निखळली. कोकण रेल्वेचे अधिकारी व इंजिनिअर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. डबे बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, रुळांची स्थिती पाहता उद्या, बुधवारी सायंकाळपर्यंत रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, असे
सांगण्यात आले. (प्रतिनिधी)