लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : न्हावेली साखळी पंचायत क्षेत्रात सरकारने एमआरएफ शेड उभारली आहे. आपला गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. कचऱ्यासंदर्भात सरकारने कायदा अधिक कडक केला आहे. गावात कचरा फेकताना कोणी आढळल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
न्हावेली ग्रामपंचायतीत उभारण्यात आलेल्या एमआरएफ शेड व नूतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी सरपंच रोहिदास कानसेकर, उपसरपंच कल्पना गावस, पंच सदस्य कालिदास गावस, नारायण गावस, रितिका गावडे, अन्शी नाईक, प्रसाद नाईक, बीडीओ ओमकार मांजरेकर, देवस्थानचे अध्यक्ष विश्वंभर गावस, न्हावेली कोमुनिदादचे अध्यक्ष सिद्धांत रमेश गावस, मुखत्यार अवधूत गावस, खजिनदार सखाराम गावस व मान्यवर उपस्थित होते.
कचरा पंचायतीकडे द्या
न्हावेली गावात एमआरएफ शेड उभारण्यासाठी जागेची आवश्यकता होती. याकरिता न्हावेली कोमुनिदादने जागा उपलब्ध करून देत या गावाला स्वच्छ व सुंदर राखण्यात मोलाचे सहकार्य केले आहे. आता नागरिकांनी स्वतः हा गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्वतःची जबाबदारी ओळखत आपल्या घरात निर्माण होणारा सर्व प्रकारचा कचरा कोणत्या खुल्या जागेत किंवा रस्त्याच्या शेजारी न फेकता थेट पंचायतीकडे सुपुर्द करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
तीन वेळा सापडल्यास वाहनाचा परवानाच रद्द
यापुढे कोणतेही वाहन आपल्या गावात कचरा फेकताना आढळल्यास थेट पोलिसांना संपर्क करून सदर वाहनाचा क्रमांक द्यावा. त्यासाठी कोणालाही हमीदार राहण्याची गरज नाही. पोलिस सदर वाहनचालकास अटक करून वाहनही जप्त करणार. तसेच अशा वाहनांना यापुढे दहा हजार रुपये दंड बजावला जाईल. एकच वाहन जर तीन वेळा कचरा टाकताना सापडले तर सदर वाहनाचा परवानाच रद्द होऊन ते वाहन कायमचे पोलिस जप्तीत राहील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.