सारीपाट, सदगुरू पाटील, संपादक
मंत्री गोविंद गावडे यांच्याकडे संघर्ष करण्याची क्षमता आहे. ते चळवळीतून पुढे आले आहेत. उटाच्या आंदोलनाने त्यांच्या नेतृत्वाला आकार दिला. त्यांनी कधी केवळ आमदार म्हणून काम केले नाही. त्यांना निवडून येताच थेट मंत्रिपद मिळाले. मनोहर पर्रीकर आणि नंतर प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातही ते मंत्रिपदी विराजमान झाले. अनुसूचित जमातीमधील तरुण वर्गाने, युवकांनी गोविंद गावडे यांची प्रियोळमध्ये साथ दिली. त्यामुळे ते प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आमदार झाले. त्यांना क्रीडा मंत्री, कला व संस्कृती मंत्री म्हणून कायम सक्रिय राहण्याची व नव्या कल्पना राबविण्याचीही आवड आहे. धडाडी दाखवण्याची ऊर्जा व कौशल्य त्यांच्याकडे आहे. दिगंबर कामत मुख्यमंत्रिपदी असताना उटाचे आंदोलन हिंसक झाले होते. गावडे वगैरेंना त्यावेळी तुरुंगवास झाला होता. त्यातून गोव्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले. आपण अपक्ष राहून जिंकलो तरच मंत्री होऊ शकतो, हे गावडे यांनी ओळखले होते. काँग्रेस व भाजपचेही तिकीट नाकारून ते प्रथम निवडून आले. ढवळीकर बंधूंना आव्हान देत ते निवडून आले. कधी रवी नाईक तर कधी पर्रीकर हे गावडे यांना मार्गदर्शक म्हणून लाभले.
गावडे यांच्याकडे नाटकात काम करण्याची आणि ऐतिहासिक संवादफेक करण्याचीही चांगली कला आहे. ते मराठी व कोंकणी या दोन्ही भाषांत उत्तम संवाद साधू शकतात. त्याबाबतीत एकेकाळी विष्णू वाघ हेही त्यांचे मार्गदर्शक होते. समाजाच्या तळागाळातून आलेले नेतृत्व म्हणून गावडे यांना चांगले भवितव्य आहे. पण त्यांची आक्रमक भाषा त्यांच्यासाठी खूप अडचणीचीही ठरत आहे. सध्या कला अकादमीविषयी झालेला वाद व मध्यंतरी मगो पक्षाच्या नेत्यांवर त्यांनी केलेली व्यक्तिगत टीका, मंत्री म्हणून त्यांच्या प्रतिमेला धक्का देणारी ठरली आहे.
भाजपच्या कोअर टीममधील काहीजणांकडून मिळालेली ताजी माहिती अशी की- मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही सध्या चिंतेत आहेत. मंत्री गावडे यांची आक्रमक भाषा कशी रोखावी, याची चिंता मुख्यमंत्री सावंत यांना वाटत आहेत. भाजपच्या आतिल गोटात तशीच चर्चा आहे. सदानंद तानावडे भाजप प्रदेशाध्यक्षपदी असताना गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याचा निर्णय दिल्लीत झाला होता. मात्र मुख्यमंत्री सावंत यांनी गावडे यांना काढू नका, असे काहीजणांना दिल्लीत सूचविले होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणे भाजपला परवडणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत सांगितले होते. त्यामुळे मंत्रिपद कायम राहिले. भाजपच्या एका कोअर टीम बैठकीत त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की- लोकसभा निवडणूक होऊ दे, मी लगेच कला अकादमीचा चेअरमन बदलतो. मात्र मुख्यमंत्र्यांनी पुढे आपल्या त्या विचाराची अंमलबजावणी केली नाही, असे भाजपचे एक पदाधिकारी खासगीत मीडियाला सांगतात. अर्थात मंत्रिमंडळात पुढील महिन्यात बदल होणारच आहेत. एकदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बदलले की मग गोव्यात बदल करूया असे केंद्रातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तो भाग वेगळा. मात्र मंत्री गोविंद गावडे हे स्वतःच्या आक्रमक शैलीने संकटांना निमंत्रण देत आहेत.
कला अकादमीवर एकूण साठ कोटी रुपये सरकारने खर्च केले. सार्वजनिक बांधकाम खाते, कला व संस्कृती खाते ही दोन्ही खाती लोकांसाठी नाराजीचा विषय बनली आहेत, ती या साठ कोटींमुळेच. नूतनीकरणाचे काम दर्जेदार केले गेले नाही असा अनेक कलाकारांचा आक्षेप आहे. अर्थात याबाबत एकट्या मंत्री गावडे यांना दोषी धरता येणार नाही. पण गावडे यांनी मीडियाशी सर्वच विषयांवर जास्त बोलणे व आक्रमक बोलणे टाळायला हवे. मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे बांधकाम खाते आहे. पण त्यांना मीडियाने शरद पोंक्षे यांच्या अनुभवाविषयी त्या दिवशी विचारले तेव्हा त्यांनी एक शब्दही बोलणे टाळले. कला अकादमीविषयी मुख्यमंत्री जाहीरपणे जास्त बोलत नाहीत. अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. साठ कोर्टीचा निधी अर्थ खात्यानेच कला अकादमीसाठी दिला, पण त्याविषयी जास्त बोलून वाद वाढवणे मुख्यमंत्री टाळतात. मंत्री गावडे यांनीदेखील यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. मात्र कला अकादमीत सुधारणा घडवून आणणे ही मंत्री गावडे यांची व मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. दोघांनाही कलाकारांचे पूर्णपणे समाधान होईल एवढी सुधारणा अकादमीत करावी लागेल.
मंत्री गावडे यांनी गोव्यातील सर्व कलाकारांसमोर किंवा शरद पोंक्षे यांच्यासमोर झुकायला हवे असे कुणी म्हणणार नाही. गावडे यांनी पोंक्षे यांची माफी मागावी असेही कुणी सुचवणार नाही, पण 'पुरुष' नाट्यप्रयोगावेळी पोंक्षे यांना खूप कटू अनुभव आला. त्यामुळे ते जाहीरपणे बोलले, हे मान्य करावे लागेल. सुपारी घेण्याचा विषयच येत नाही. गावडे यांनी कला अकादमीतील तांत्रिक दोषाविषयी अकादमीच्या सदस्य सचिवांनाच पत्रकार परिषद घ्यायला लावायला हवे होते. त्याऐवजी ते स्वतः मीडियासमोर आले आणि आपल्याला टार्गेट करण्यासाठी काहीजणांनी सुपारी घेतलीय असे विधान गावडे यांनी केले. त्यांनी पोंक्षे यांना सुपारीबाज ठरविले नसेलही, पण लोकांमध्ये तसा संदेश गेला. कला अकादमीवर साठ कोटी खर्चुनही कलाकार खूश नाहीत. अकादमीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असे काही कलाकार अनुभव घेतल्यानंतर बोलतात. समजा आज मनोहर पर्रीकर विरोधी पक्षनेते असते तर त्यांनी हम कला अकादमी घुस लेंगे अशी कसिनोटाईप घोषणा केली असती.
प्रकल्पांच्या कामांवर खर्च होणारा पैसा जनतेचा आहे. कला अकादमीत पुरुष नाटकावेळी जे काही घडले, तो तांत्रिक बिघाड होता, त्यात अकादमीची चूक नव्हतीच हा मंत्री गावडे यांचा दावा आहे. तांत्रिक बिघाड होतो तेव्हा स्थिती कुणाच्याच हातात नसते, अशी गावडे यांची भूमिका आहे. कला अकादमीचा तांत्रिक स्टाफ नाटकावेळी उपस्थित होता, कुणी उपस्थितच नव्हते, हा पोंक्षे यांचा दावा खोटा असल्याचेही गावडे सांगतात. तेही खरे असेल. मात्र कला अकादमीतील अन्य काही त्रुटीही पोंक्षे यांनी जाहीरपणे मांडल्या आहेत. तिथे गावडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. शरद पोंक्षे यांना नाट्यप्रयोग अर्धवट सोडावा लागला आणि प्रेक्षकांचादेखील तांत्रिक दोषांमुळे प्रचंड विरस झाला, ही वस्तुस्थिती आहे. पोंक्षे हे कलाकाराच्या भूमिकेतून, कला अकादमीत सुधारणा व्हावी म्हणून बोलले होते. त्यांनी नाराजी व रागाच्या भरात थोडे कठोर शब्द वापरलेले असू शकतात.
कला अकादमीला कुणी बदनाम करू नये, हे मंत्री गावडे यांचे आवाहन आम्ही समजू शकतो. गोव्यातील विरोधकांपैकी काहीजण अकादमीच्या आडून मंत्री गावडे यांना लक्ष्य बनवू पाहतात, असेदेखील गावडे म्हणू शकतात. मात्र पोंक्षे यांनी किंवा गोव्यातील कलाकारांनी सुपारी घेतलीय असा अर्थ होत नाही. आपण पोंक्षे यांनी सुपारी घेतलीय असे म्हटले नव्हते, असे स्पष्टीकरण गावडे यांनी नंतर दिले आहे. मात्र पोंक्षे यांनी आधी गोमंतकीयांची माफी मागावी ही गावडे यांची भूमिका हास्यास्पद वाटते.
कला अकादमीची बदनामी पोंक्षे यांनी केलेली नाही, ती अगोदरच झालेली आहे. अकादमीत सुधारणा होणे गरजेचे आहे, हे मान्य करण्याचा उमदेपणा मंत्री गावडे यांना दाखवावा लागेल. अकादमीच्या मेकअप रुममध्ये एसीच्या मशीनमधून बर्फ पडत होता व खाली पाणी पसरू नये म्हणून कुंड्या ठेवल्या होत्या, असे पोंक्षे यांनी म्हटले आहे. त्याकडे लक्ष देऊन सुधारणा करणे जास्त गरजेचे आहे.
मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी युतीच्या विषयावरून मगो नेतृत्वाविरुद्ध विधान केले होते. त्यावेळी गावडे यांनी दोन पावले पुढे टाकत, मगो हा माधवरावांच्या गोठ्यातील पक्ष आहे असे विधान केले होते. मुख्यमंत्र्यांना ते आक्रमक विधानही आवडले नव्हते, अशी माहिती भाजपच्या विश्वसनीय गोटातूनच मिळते.
गावडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानेच ढवळीकर बंधू लगेच दिल्लीला गेले व त्यांनी बी एल संतोष यांना अनेक गोष्टी सांगितल्या हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले. नियोजित मंत्रिमंडळ फेररचना अडण्यास तेही एक कारण ठरले.
कला अकादमीच्या नूतनीकरण कामावर सरकारने एकूण ६० कोटी रुपये खर्च केले. पणजी शहर स्मार्ट करण्यावर सरकारने पाचशे कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुराडा केला. एवढे करूनही पणजीतील स्मार्ट सिटी कामाच्या दर्जावर खुद्द पणजीचे महापौर आणि पणजीचे आमदारही खूप नाराज आहेत.