गोव्यातील साहित्यिक करणार संयुक्त आंदोलन
By Admin | Updated: October 13, 2015 02:55 IST2015-10-13T02:55:02+5:302015-10-13T02:55:11+5:30
पणजी : देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांवर तसेच दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या खुन्यांच्या विरोधात अद्याप ठोस कारवाई न केल्याने राज्यातल्या

गोव्यातील साहित्यिक करणार संयुक्त आंदोलन
पणजी : देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांवर तसेच दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या खुन्यांच्या विरोधात अद्याप ठोस कारवाई न केल्याने राज्यातल्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकांनी एकत्र येऊन संयुक्त निषेध आंदोलन करण्याचे ठरविले आहे. याविषयी १४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता पणजी येथील जीसीसीआयच्या सभागृहात बैठक घेण्यात येणार असल्याचे कोकणी साहित्यिक व कोकणी लेखक संघाचे अध्यक्ष एन. शिवदास यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक दत्ता दा. नायक व एन. शिवदास यांनी ही बैठक बोलावली आहे.
२००५ साली ‘भांगरसाळ’ पुस्तकासाठी मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार आपण परत करणार असल्याचे एन. शिवदास यांनी जाहीर केले होते; पण आपला निर्णय बुधवारी होणाऱ्या बैठकीपर्यंत स्थगित ठेवल्याचे शिवदास यांनी सांगितले. गोव्यातील सर्व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक एकत्र येऊन यावर निर्णय घेतील, असे ते म्हणाले. साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला असून, आरोपींवर कारवाई न केल्याचा निषेध केल्याने सध्या काही प्रमाणात वातावरण निवळल्याचे ते म्हणाले.
बुधवारी होणाऱ्या बैठकीत साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते २० लेखक उपस्थित राहणार असून पद्मश्री पुरस्कार विजेत्या मारिया आवरोरा कुतो, गोव्यात स्थायिक झालेले साहित्यिक सुधीर कक्कर, अमिताव घोष यांचाही त्यात समावेश असेल. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या, लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे वातावरण, धार्मिक सलोखा व धर्मनिरपेक्षता या विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे नायक यांनी सांगितले.
गोव्यात १९७५ पासून ३२ कोकणी लेखकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत. यातले काही साहित्यिक हयात नाहीत. हयात असलेल्या पुरस्कार विजेत्यांमध्ये दामोदर मावजो, पुंडलिक नायक, प्रकाश पाडगावकर, रमेश वेळुस्कर, नागेश करमली, महाबळेश्वर सैल, दिलीप बोरकर, माधव बोरकर, हेमा नायक, जयंती नायक, एन. शिवदास, दत्ता दा. नायक, देविदास कदम, अशोक कामत, जेस फर्नांडिस, अरुण साखरदांडे, काशिनाथ शांबा लोलयेकर व तुकाराम शेट यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)