जॉन फर्नांडिसना सर्वाधिकार
By Admin | Updated: May 23, 2014 01:01 IST2014-05-23T00:59:18+5:302014-05-23T01:01:54+5:30
जॉन फर्नांडिसना सर्वाधिकार

जॉन फर्नांडिसना सर्वाधिकार
पणजी : काँग्रेसचे जे आमदार पक्षासाठी काम करत नाहीत, जे आमदार पक्ष सोडून जाण्याची व नवा पक्ष स्थापन करण्याची भाषा करतात, जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते पक्षविरोधी कारवाया करतात, अशा सर्वांना वठणीवर आणण्याचे सर्वाधिकार काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांना दिले आहेत. बेशिस्तीविरुद्ध कारवाई करण्यासाठीची सात सदस्यीय समिती सोनिया गांधी यांच्याकडून मंजूर करून घेऊन प्रदेशाध्यक्ष फर्नांडिस गुरुवारी गोव्यात परतले. तीन दिवसांच्या दिल्ली भेटीवेळी फर्नांडिस यांनी दिग्विजय सिंग यांच्यासह काँग्रेसच्या अनेक केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या व गोव्यातील स्थितीबाबतचा अहवाल त्यांना सादर केला. लोकसभा निवडणुकीत गोव्यात काँग्रेसच्या वाट्याला अशी स्थिती का आली, याचीही माहिती फर्नांडिस यांनी केंद्रीय नेत्यांना दिली. लोकसभा निवडणुकीवेळी पक्षविरोधी कारवाया झाल्याबाबतच्या ज्या तक्रारी आहेत किंवा ज्या नव्या तक्रारी येतील, त्या तक्रारींच्या अनुषंगाने सात सदस्यीय समिती चौकशी करील व त्यानंतर कारवाई सुरू केली जाईल, असे फर्नांडिस यांनी दिल्लीहून परतल्यानंतर ‘लोकमत’ला सांगितले. निमंत्रकांसह सातही सदस्यांची नावे आपण दोन दिवसांत जाहीर करीन. पक्षविरोधी कारवाया करण्यात आल्याच्या तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर संबंधित आमदाराला किंवा पदाधिकार्याला किंवा कार्यकर्त्याला नोटीस पाठवून त्याविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार आपल्याला देण्यात आला आहे, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. आम्ही सर्व स्तरांवर काँग्रेस पक्ष बळकट करणार आहोत. ज्या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत व जिथे काँग्रेसचे आमदार नाहीत, अशा सर्व मतदारसंघात काँग्रेस पक्ष संघटना सक्रिय केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. बाबूश मोन्सेरात यांच्यासारखे आमदार नवा प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याची भाषा करत आहेत, त्याविषयी विचारले असता, फर्नांडिस म्हणाले की, ज्यांना पक्ष सोडून जायचा आहे, त्यांनी खुशाल जावे, अशी आता काँग्रेसची भूमिका आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाण्याऐवजी आताच ते पक्षाबाहेर गेलेले बरे. जेणेकरून आम्हाला पक्षाची बांधणी तरी अडचणींविना करता येईल. आम्ही कुणाला थांबवणार नाही. एकदा पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेतले जाणार नाही. (खास प्रतिनिधी)