तुरुंग अधीक्षकानेच मारायला सांगितले!
By Admin | Updated: October 15, 2015 02:13 IST2015-10-15T02:13:16+5:302015-10-15T02:13:44+5:30
पणजी : कोलवाळ येथील तुरुंगातील कैद्यांना मारहाण करण्यास तुरुंग रक्षकांना तेथील अधीक्षक मेल्वीन वाझ यानेच सांगितले होते, असा प्राथमिक निष्कर्ष सरकारने काढला आहे.

तुरुंग अधीक्षकानेच मारायला सांगितले!
पणजी : कोलवाळ येथील तुरुंगातील कैद्यांना मारहाण करण्यास तुरुंग रक्षकांना तेथील अधीक्षक मेल्वीन वाझ यानेच सांगितले होते, असा प्राथमिक निष्कर्ष सरकारने काढला आहे. त्या दृष्टिकोनातून चौकशी करण्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी सचिन शिंदे (आयएएस) यांना सांगितले आहे.
कोलवाळमधील अनेक कैद्यांना सोमवारी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकाराची दखल घेऊन तुरुंग महानिरीक्षक एल्वीस गोम्स यांनी जरी पाच तुरुंग रक्षकांना सेवेतून निलंबित केले, तरी अधीक्षक मेल्वीन वाझ यांना मात्र गोम्स यांनी थेट दोष दिला नव्हता. मंगळवारी रात्रीच गोम्स यांनी कोलवाळ घटनेची चौकशी करून आपला प्राथमिक अहवाल मुख्य सचिवांना सादर केला. मारहाणीवेळी वाझ यांची भूमिका काय होती, याची चौकशी व्हायला हवी, असे गोम्स यांनी सरकारला सुचविले. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी कोलवाळ तुरुंगातील एकूण प्रकाराची गंभीरपणे दखल घेतली व मुख्य सचिवांशी रात्रीच चर्चा केली. वाझ यांनीच कैद्यांना मारहाण करा, असे तुरुंग रक्षकांना सांगितले होते, अशी प्राथमिक माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली व त्यामुळे वाझ यांना त्वरित सेवेतून निलंबित करा, असा आदेश पार्सेकर यांनी मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांना दिला. वाझ यांची मंगळवारी सायंकाळी सरकारने कोलवाळहून मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली व नियुक्ती केली होती. तथापि, पार्सेकर यांनी बदली रद्द करा व वाझ यांना निलंबित करा, अशी सूचना मुख्य सचिवांना केली. वाझ यांच्या निलंबनाचा रितसर लेखी आदेश बुधवारी जारी झाला. ‘लोकमत’ने सर्वप्रथम बुधवारच्या अंकात वाझ यांच्या निलंबनाचे वृत्त दिले.
वाझ या अधिकाऱ्याची कारकिर्द कायम वादाची राहिलेली आहे. वाझ यांनी खरोखरच मारहाणीचा आदेश दिला होता काय, हे सचिन शिंदे यांच्या चौकशीतून निष्पन्न होईल. चौकशी अधिकाऱ्यावर दबाव येऊ नये या हेतूनेच मुख्यमंत्र्यांनी शिंदे या आयएएस अधिकाऱ्याकडे चौकशीचे काम सोपविले.
(खास प्रतिनिधी)