वास्कोत दुमदुमला 'जय जय राम कृष्ण हरी' नामाचा जयघोष; १२६ व्या देव दामोदर भजनी सप्ताहास सुरुवात
By पंकज शेट्ये | Updated: July 31, 2025 13:28 IST2025-07-31T13:27:31+5:302025-07-31T13:28:28+5:30
मंत्री, आमदारांसह शेकडो भाविकांकडून दर्शन

वास्कोत दुमदुमला 'जय जय राम कृष्ण हरी' नामाचा जयघोष; १२६ व्या देव दामोदर भजनी सप्ताहास सुरुवात
पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: बुधवारी (दि.३०) दुपारी १२:३० वा. वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदर चरणी उद्योजक प्रशांत जोशी यांच्याहस्ते श्रीफळ अर्पण केल्यानंतर १२६ व्या अखंड २४ तासाच्या देव दामोदर भजनी सप्ताहाला सुरुवात झाली. गुरुवारी (दि.३१) दुपारी खारीवाडा समुद्रात मागच्या वर्षाचा देवा चरणी ठेवलेल्या श्रीफळाचे विसर्जन केल्यानंतर भजनी सप्ताहाची सांगता होईल. बुधवारी पहाटे ५:३० वाजल्यापासूनच भक्तांनी मंदिरात येत 'श्रीं' चे दर्शन घेण्यास सुरुवात केली होती.
दुपारी १२:३० वा. सप्ताहाला सुरुवात होत असल्याने मंदिरात शेकडो भक्तांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. प्रशांत वसंतराव जोशी यांनी १२:३० वाजता देवाच्या चरणी श्रीफळ अर्पण केल्यानंतर 'हरी जय जय राम कृष्णा हरी' च्या गजरात सप्ताहाला सुरुवात झाली. सुरक्षेच्या दृष्टीने यंदा दामोदर भजनी सप्ताहाच्या सुरुवातीला मंदिरात मोठी गर्दी होऊ नये यासाठी काळजी घेतली होती. त्यामुळे सप्ताहाची सुरुवात होताना मंदिराबाहेर मोठ्या संख्येने भक्तांनी उभे राहून देवदर्शन घेतले. मंदिराचे मुख्य पुरोहित भूषण जोशी यांनी देवासमोर सामूहिक गान्हाणे घालून भक्तगणांकडून करण्यात येणारी सेवा मान्य करावी, अशी प्रार्थना केली.
सप्ताहाची सुरुवात झाल्यानंतर मंदिरात चालणाऱ्या अखंड २४ तासाच्या भजनात वास्को आणि मुरगाव तालुक्यातील २३ भजनी पथके २४ तास भजन सादर करणार असून त्यांना दिलेल्या वेळेनुसार भजन सादर करण्यास सुरुवात केली.
सप्ताहानिमित्ताने पारंपरिकरीत्या विविध समाजाचे येणारे दिंडी पार संध्या. ६ वा. पासून मंदिराशी जाण्यास सुरू झाले. वर्ष पद्धतीनुसार वास्कोतील विविध ठिकाणी उभारलेल्या व्यासपीठांवर संध्याकाळपासून रात्रीपर्यंत गायनाच्या मैफल चालू असून त्यांचा असंख्य भाविकांनी आनंद घेतला. देव दामोदर भजनी सप्ताहाची दुपारी सुरुवात झाल्यानंतर शेकडो हिंदू बांधवांबरोबरच इतर धर्माच्या अनेक बांधवांनी मंदिरात उपस्थिती लावून देवाचा आशीर्वाद घेतला.
बुधवारी सप्ताहाच्या निमित्ताने पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मुरगाव नगराध्यक्ष गिरीश बोरकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माजीमंत्री मिलिंद नाईक यांच्यासह अनेक विविध क्षेत्रातील बांधवांनी मंदिरात येऊन 'श्रीं'चा आशीर्वाद घेतला.
संपूर्ण शहरात रोषणाई
सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण वास्को शहरातील स्वतंत्रपथ, एफएल गोम्स मार्ग, मुरगाव नगरपालिका इमारतही आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आली असून वास्कोतील शेकडो बांधवांनी आपल्या घराबाहेरील परिसरातही सप्ताहाच्या निमित्ताने रोषणाई केली आहे. तसेच दामोदर भजनी सप्ताहाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे उद्योजक बंधू श्रीपाद शेट्ये आणि संजय शेट्ये यांनी स्वतंत्र पथ मार्गाच्या प्रवेशद्वारावर भाविक-भक्तगणांच्या स्वागतासाठी उभारलेली आकर्षक कमान सर्वांचे लक्ष वेधत आहे.
पोलिसांची करडी नजर
फेरीतही मोठी गर्दी दिसून आली. सप्ताहादरम्यान कुठल्याच प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त सर्व हालचालीवर नजर ठेवताना दिसून आले. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराबाहेरील आवारात आणि स्वतंत्र पथ मार्गावर थाटलेल्या फेरीच्या विविध ठिकाणी 'सीसीटीव्ही कॅमेरा' द्वारे पोलिसांनी सर्व परिसरावर कडक नजर ठेवली आहे. गुरुवारी भजनी सप्ताहाची सांगता होणार असली तरी सप्ताहानिमित्ताने थाटलेली फेरी पुढच्या सहा दिवसांसाठी असेल.