- सुशांत कुंकळयेकर मडगाव - पन्नास वर्षापूर्वी गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम ठेवणा-या ओपिनियन पोल म्हणजेच जनमत कौलाच्यावेळी विलिनीकरण विरोधी भूमिका घेतलेले युनायटेड गोअन्स पार्टीचे अध्यक्ष जॅक सिक्वेरा यांचा पुतळा गोवा विधानसभेच्या आवारात उभारावा की नाही याबद्दल वेगवेगळ्या पक्षात मतभेद असताना सिक्वेरा हे कॅथोलिक असल्यामुळेच आजवर त्यांच्यावर अन्याय झाला असा आरोप गोव्यातील राष्ट्रवादी पक्षाचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनी केला आहे. त्यामुळे आता या वादाला धार्मिक वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मंगळवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आलेमाव म्हणाले, जर सिक्वेरा कॅथोलिक नसते तर आतार्पयत त्यांचा पुतळा विधानसभा आवारात उभा झाला असता. ते कॅथोलिक असल्यामुळेच त्यांच्या नावाला मगो पक्षाकडून विरोध होत आहे. सिक्वेरा यांचे गोव्यासाठीचे योगदान मोठे असून सध्या गोव्यात बांधलेल्या तिस:या मांडवी पुलाला सिक्वेरा यांचे नाव द्यावे अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वी मागच्यावर्षी गोवा फॉरवर्ड पक्षाने सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा आवारात उभारावा अशी मागणी केली होती. या मागणीला मगोकडून विरोध झाला होता. आता पुन्हा एकदा हा वाद ऐरणीवर आला असून गोवा सुरक्षा मंचानेही सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा आवारात उभारण्यास विरोध केला आहे.सत्ताधारी पक्षाचा घटक असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी 16 जानेवारी रोजी जनमतकौल विजय दिन साजरा करताना मेरशी येथे डॉ. सिक्वेरा यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण करताना जनमत कौल दिन हा गोवा मुक्ती दिनापेक्षाही अधिक महत्वाचा असे वक्तव्य केल्यानंतर गोव्यात पुन्हा या विषयावरुन राजकीय वाद निर्माण झाला होता. मगो व गोवा सुरक्षा मंच या दोन्ही पक्षांनी सरदेसाई यांनी गोवा मुक्ती लढय़ातील स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला असा दावा करुन सरदेसाई यांनी त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली होती. काल सोमवारी सरदेसाई यांनी या दोन्ही पक्षांना उत्तर देताना हे पक्ष राष्ट्रवादाच्या नावाखाली अजुनही महाराष्ट्रवाद चालवितात असा आरोप करुन माफी मागण्यास नकार दिला होता. हा वाद अजुन शमलेला नसतानाच आलेमाव यांनी मंगळवारी या वादाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.जनमत कौलाच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाल्यास गोवा मुक्तीनंतर गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण करावे अशी मागणी एका गटाकडून केली जात होती तर दुसरा गट या विलिनीकरणाला विरोध करत होता. विलिनीकरणवाद्यांचे नेतृत्व मगो पक्ष करत होता तर काँग्रेस व युनायटेड गोअन्स हे दोन्ही पक्ष या विलिनीकरणाला विरोध करत होते. या मागणीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने 1967 साली गोव्यातील लोकांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे ठरविण्यासाठी जनमत कौल घेतला होता. 16 जानेवारी 1967 रोजी त्याचा निकाल लागला होता. त्यावेळी गोमंतकीयांनी विलिनीकरणाला विरोध करुन गोव्याचा संघप्रदेशाचा दर्जा कायम ठेवला होता. डॉ. सिक्वेरा हे या लढय़ातील एक महत्वाचे नेते होते. गोव्यातील पहिल्या दोन विधानसभेच्या कार्यकाळात डॉ. सिक्वेरा हे विरोधी पक्ष नेतेही होते.
जॅक सिक्वेरा कॅथोलिक म्हणूनच त्यांच्यावर अन्याय, चर्चिल आलेमाव यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 17:02 IST