The issue of closed-mines in Goa will be repeated in the rainy season | गोव्यातील बंद खाणींचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात पुन्हा ऐरणीवर
गोव्यातील बंद खाणींचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात पुन्हा ऐरणीवर

मडगाव - सध्या गोव्यात जो खाण उद्योग बंद पडला आहे तो पुन्हा सुरू व्हावा यासाठी खाण पट्टय़ातील लोकांकडून दबाव वाढू लागला असून येत्या महिन्यापासून सुरु होणा-या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणण्याचे संकेत विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर  यांनी दिले आहेत.

गोव्यात बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू होण्याची गरज आहे आणि त्यासाठी गोवा सरकारने ठोस पाऊले उचलण्याची गरज कवळेकर यांनी व्यक्त केली असून येत्या पावसाळी अधिवेशनात आपण हा प्रश्न पुन्हा चर्चेत आणू. स्थगन प्रस्ताव, लक्षवेधी सूचना आदी माध्यमांतून हा प्रश्न विधानसभेच्या पटलावर आपण चर्चेला आणणार असे त्यांनी सांगितले.

गुरुवारी खाण कामगारांनी कवळेकर यांची त्यांच्या बेतूल येथील निवासस्थानी भेट घेऊन खाण उद्योग पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. अशीच मागणी आपण वीजमंत्री निलेश काब्राल तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांच्याकडेही करु असे या शिष्टमंडळाने यावेळी सांगितले. किमान येत्या मोसमात तरी हा उद्योग सुरु व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोव्यातील सर्व खाणींची लिजेस गोठवण्यात आली असून त्यामुळे मागची काही वर्षे गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा खाण उद्योग बंद पडला आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर कामगारांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या खाण पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर बेकारी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता खाण कामगारांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे.

गोव्यातील खाणी सुरु व्हाव्यात यासाठी काँग्रेस पक्षाने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आता ठोस प्रयत्न सरकारकडून होण्याची गरज आहे. आतार्पयत खाण अवलंबितांना सरकारकडून आश्वासनेच मिळालेली आहेत. आश्वासनांनी काम भागणार नाही. हा उद्योग नेमका कधी सुरु होणार हे आता सरकारने स्पष्ट करण्याची गरज आहे. खाण पट्टय़ातील आमदार असलेले प्रमोद सावंत हे आता मुख्यमंत्री झाले आहेत. तर निलेश काब्राल व दीपक पाऊसकर हे मंत्री आहेत. केंद्रातही भाजपाचे सरकार असल्याने गोवा सरकारकडून आता विषेश प्रयत्नाची गरज कवळेकर यांनी व्यक्त केली. जर गोवा सरकार पुन्हा एकदा सर्वपक्षीय शिष्टमंडळ प्रधानमंत्र्यांकडे घेऊन जात असेल तर त्यात सामील होण्याची आमची तयारी आहे. दिल्लीतूनही आमच्या पक्षाचा पाठिंबा गोव्यातील खाणी परत सुरु होण्यासाठी असेल असे कवळेकर यांनी सांगितले.


Web Title: The issue of closed-mines in Goa will be repeated in the rainy season
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.