पणजीच्या पोटनिवडणुकीत तापतोय कॅसिनोंचा मुद्दा

By Admin | Updated: January 25, 2015 01:42 IST2015-01-25T01:39:28+5:302015-01-25T01:42:14+5:30

मुख्यमंत्री, काँग्रेस यांच्यात वाद

The issue of a cascading situation in Panaji bye-election | पणजीच्या पोटनिवडणुकीत तापतोय कॅसिनोंचा मुद्दा

पणजीच्या पोटनिवडणुकीत तापतोय कॅसिनोंचा मुद्दा

पणजी : पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २०१२च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा कॅसिनोंचा विषय तापू लागला आहे. हा वाद कुणावर बूमरँग होतोय हे नजीकच्या काळातच स्पष्ट होणार आहे.
पणजीतील वाहतुकीची कोंडी, कचरा प्रश्न, पे-पार्किंगचा विषय असे मुद्दे निवडणुकीनिमित्त चर्चेत आले आहेतच; पण सर्वात जास्त कॅसिनोंचा विषय पेटू लागला आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना शनिवारी पत्रकारांनी कॅसिनोंच्या विषयाबाबत विचारले असता, ते म्हणाले की मांडवी नदीत कॅसिनो भाजप सरकारने आणले नाही, ते काँग्रेस सरकारने आणले होते व त्यामुळे काँग्रेसवर कॅसिनोविरोधी प्रचार बूमरँग होईल.
मुख्यमंत्री म्हणाले, की मांडवी नदीत आणखी नव्या कॅसिनोंना स्थान दिले जाणार नाही. सध्याच्या कॅसिनो जहाजांना दुसरीकडे जागा द्यावी, असा सरकारचा विचार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी भाजपला २०१२च्या निवडणूक जाहीरनाम्याची आठवण करून दिली आहे. आपण सत्तेवर आल्यानंतर कॅसिनोंना मांडवीतून हाकलले जाईल, अशी ग्वाही भाजपने दिली होती. तीन वर्षांत त्यांनी काय केले ते सांगावे. उलट आता मांडवीत फ्लॉटेलही आणले जात आहे, असे फालेरो दोन दिवसांपूर्वी पत्रकारांजवळ म्हणाले होते.
काँग्रेसच्या मीडिया सेलचे सदस्य दुर्गादास कामत यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या विधानास प्रत्युत्तर दिले. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत कॅसिनोंचा विषय भाजपवर बूमरँग होईल, असे कामत यांनी म्हटले आहे. भाजप आपले तथाकथित संघ ‘तत्त्व’ कॅसिनोंच्या मुद्द्यावर विसरला आहे, असा टोला कामत यांनी हाणला. कॅसिनोंमध्ये काम करणाऱ्या गोमंतकीय युवकांना कॅसिनो मालकांनी व सरकारनेही वाऱ्यावर टाकले आहे, असे कामत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मांडवी नदीत सध्या पाच तरंगते कॅसिनो आहेत. (खास प्रतिनिधी)

Web Title: The issue of a cascading situation in Panaji bye-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.