राज्यात एक लाख महिलांना व्याजमुक्त कर्ज: मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2024 12:48 IST2024-12-03T12:45:00+5:302024-12-03T12:48:54+5:30
'आरडीए' मार्फत लाभ : महिला उद्योजकांना प्रोत्साहन

राज्यात एक लाख महिलांना व्याजमुक्त कर्ज: मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात आरडीएमार्फत तब्बल एक लाख महिलांनी व्याजमुक्त कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. दोनापावल येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला विभागाने आयोजित 'ग्रँड अस्तुरी' कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो व इतर मान्यवर उपस्थित होते. 'ग्रॅण्ड अस्तुरी' कार्यक्रमाची ही अकरावी आवृत्ती होती. दिव्यांग उद्योजकांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करणारे खास क्युरेट केलेले स्टॉलदेखील येथे थाटण्यात आले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, 'आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमांतर्गत महिला सबलीकरणही केले जात आहे. केंद्र सरकार आरडीएमार्फत महिलांना उद्योजकतेसाठी एक ते पाच लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देते. गोव्यात याचा एक लाख महिलांनी लाभ घेतला व आपले छोटे व्यवसाय सुरू केले, तर देशभरात आतापर्यंत ४० कोटी रुपये व्याजमुक्त कर्ज वितरित झाले.'
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे बॅण्डिंग, पॅकेजिंग, मार्केटिंगसाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्सनेही हातभार लावायला हवा. संपूर्ण भारतातील महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी व्यासपीठ प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण विकास संस्थेची व्याजमुक्त कर्ज योजना महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अशा कार्यक्रमांद्वारे 'लखपती दीदी' तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.'
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीयांना डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममधील स्टॉलना भेट द्यावी आणि महिला उद्योजकांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.