लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यात पूर्वी अनेक प्रकारच्या कला अस्तित्वात होत्या; परंतु काळाच्या ओघात काही कला लुप्त होत चालल्या आहेत की काय, अशी भीती वाटू लागली आहे. सुवारी सारखी लोकपरंपरा सांभाळून ठेवण्यासाठी आता कला क्षेत्रातील संस्थांनी पुढे यायला हवे, असे आवाहन एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी केले.
संस्कारभारती संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहकार भारती गोवाचे अध्यक्ष डॉ. भूषण भावे, प्रांत महामंत्री संदेश खेडेकर, संस्कार भारती गोवा कोकण संघटनमंत्री उदय शेवडे, सत्कार मूर्ती प्रकाश नाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते. सुवारी वादनात योगदान दिलेल्या प्रकाश नाईक यांना यावेळी गुरू म्हणून सन्मानित करण्यात आले.
यावेळी सावईकर पुढे म्हणाले की कला, कलाकार व गोवा यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच गोवा सरकार या घटकांसाठी भरीव काम करत आहे. काही युवा कलाकार आधुनिक रील्सच्या माध्यमातून सांस्कृतिक गोव्याची ओळख जगासमोर आणत आहेत. त्या सर्व गोष्टींचे संकलन करणे गरजेचे आहे. येथील मंदिरांच्या माध्यमातून पारंपरिक कलांचे जतन व्हायला हवे.
मरगळ दूर करावी
यावेळी बोलताना डॉ. भूषण भावे म्हणाले की, कलेच्या क्षेत्रातील लोकांनी संस्कारभारती संस्थेशी जोडले पाहिजे, जेणेकरून कलेच्या क्षेत्रात जी काहीअंशी मरगळ आलेली आहे, ती दूर होण्यास मदत होईल.