गोव्यातील तुरूंगात ४५ कैद्यांचा सुरक्षा रक्षकांवर हल्ला
By Admin | Updated: January 25, 2017 08:46 IST2017-01-25T06:50:27+5:302017-01-25T08:46:43+5:30
वास्कोनजीकच्या सडा तुरुंगातील 45 कैद्यांनी मंगळवारी रात्रभर थैमान घालताना जेलर व इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळण्याचा प्रयत्न केला.

गोव्यातील तुरूंगात ४५ कैद्यांचा सुरक्षा रक्षकांवर हल्ला
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 25 - वास्कोनजीकच्या सडा तुरुंगातील 45 कैद्यांनी मंगळवारी रात्रभर थैमान घालताना जेलर व इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळण्याचा प्रयत्न केला.
खटले चालू असलेले आणि काही शिक्षा सुनावण्यात आलेले कैदी मिळून सर्वांनी मोठा गोंधळ घातला. हातात मिळेल ते घेऊन ते तुरुंगातील कर्मचाऱ्यांवर धावले व त्यांना मारहाण केली. जेलरलाही त्यांनी सोडले नाही. काही कर्मचाऱ्यांना खोलीत डांबून ठेवले.
पळून जाण्यासाठी या कैद्यांकडून हा स र्व प्रकार करण्यात आला, परंतु तुरुंगाच्याबाहेर सुमारे 200 पोलिसांनी वेढा घातल्यामुळे कैद्यांना पळता आले नाही. रात्री उशिरार्यंत गोंधळ चालूच होता.
दरम्यान ही घटना म्हणजे नियोजित कारस्थान असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या तुरुंगातील कैद्यांना 27 जानेवारी रोजी कोवाळ येथील नव्याने बांधण्यात आलेल्या जेलमध्ये नेण्यात येणार होते. एकदा कोलवाळ येथील तुरुंगात टाकले की तेथून निसटणे खूप कठीण गोष्ट असल्याची जाणीव या कैद्यांना होती. नव्यानेच बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा कोलवाळ तुरुंगात एकदा नेण्यात आले तर नंतर आपले काहीच चालणार नाही या भितीमुळे त्यापूर्वीच नीसटण्याचा त्यांचा हा डाव होता. परंतु तो यशस्वी झाला नाही.