लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय असून हा लढा अद्याप संपलेला नाही. जोपर्यंत संपूर्ण दहशतवादाचा बीमोड होत नाही तोपर्यंत भारतीय सैनिक त्यासाठी लढत राहतील. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही. पाक पुरस्कृत दहशतवाद ठेचून काढताना दहशतदाद्यांना पाकिस्तानात घुसून चारीमुंड्या चीत करत त्यांचे तळ उदध्वस्त केले. भारतीय सैनिकांनी देशाची ताकद जगाला दाखवून दिली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
साखळी शहरात शनिवारी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा उपस्थितांनी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी साखळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, विविध पंचायतींचे प्रतिनिधी, भाजप कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
... तोवर गप्प बसणार नाही
दहशतवादाच्या विरोधात आमची लढाई असून दहशतवाद पूर्ण ठेचून काढेपर्यंत भारत गप्प बसणार नाही. दहशतवाद संपविणे हेच आमचे उद्दिष्ट असून आम्ही कोणाच्या धर्म व देशाच्या विरोधात नाही, असेही मुख्यमंत्री सावंत यावेळी बोलताना म्हणाले.
देश, धर्माविरुद्ध नव्हे तर दहशतवादाच्या विरोधात
मुख्यमंत्री म्हणाले, आमचा लढा हा कोणा देशाविरुद्ध किंवा धर्माविरुद्ध नसून दहशतवादी ताकद नेस्तनाबूद करणे हा आमच्या देशाचा संकल्प आहे. त्या कार्यात शूरवीरांना आमचा सलाम. भारतीय सैनिकांचा जोश वाढवण्यासाठी या तिरंगी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण देश जवानांच्या पाठीशी खंबीर उभा आहे.