भारताला आणि चीनला दहशतवादावर मतभेद परवडणारे नाहीत - पंतप्रधान मोदी
By Admin | Updated: October 15, 2016 22:17 IST2016-10-15T22:17:03+5:302016-10-15T22:17:44+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये शनिवारी चर्चा झाली. या चर्चेमध्ये जिनपिंग यांनी दहशतवाद महत्वाचा मुद्दा असल्याचे मान्य केले.

भारताला आणि चीनला दहशतवादावर मतभेद परवडणारे नाहीत - पंतप्रधान मोदी
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये शनिवारी चर्चा झाली. या चर्चेमध्ये जिनपिंग यांनी दहशतवाद महत्वाचा मुद्दा असल्याचे मान्य केले पण संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझरवर बंदी घालण्यासाठी भारताने मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे कोणतेही आश्वासन दिले नाही.
ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची शनिवारी गोव्यामध्ये भेट झाली. दहशतवादाच्या मुद्दावर भारत आणि चीन दोघांनाही मतभेद परवडणारे नसल्याचे पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना स्पष्ट केले. मसूद अझरवर बंदी घालण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये मांडलेल्या प्रस्तावाच्या दृष्टीने मोदी यांचे हे विधान महत्वाचे आहे.
चीनने खोडा घातल्यामुळे मसूद अझरवरील बंदीचा प्रस्ताव रखडला आहे. दहशतवाद्याच्या मुद्यावर दोन्ही नेत्यांमध्ये विस्तृत चर्चा झाली आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी समन्वय अधिक वाढवणे आवश्यक असल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिली. जनिपिंग यांच्याबरोबर झालेल्या चर्चेमध्ये मोदींनी एनएसजी सदस्यत्व, मसूद अझरवर बंदी हे मुद्दे उपस्थित केले. चर्चा समाधानकारक झाल्याचे पंतप्रधान मोदींकडून सांगण्यात आले.