स्वतंत्र पक्ष स्थापनेचा नाद सोडला : बाबूश
By Admin | Updated: June 10, 2014 01:49 IST2014-06-10T01:47:22+5:302014-06-10T01:49:26+5:30
पणजी : नवा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने सांताक्रुझचे काँग्रेस आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नवा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा नाद सोडून दिला आहे.

स्वतंत्र पक्ष स्थापनेचा नाद सोडला : बाबूश
पणजी : नवा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने सांताक्रुझचे काँग्रेस आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नवा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा नाद सोडून दिला आहे. मात्र, काँग्रेसमधून बाहेर पडून जमल्यास भाजपशी सोयरिक करावी व आपल्याऐवजी पत्नीला मंत्रिपद देण्यास भाजपला सांगावे, असा प्रस्ताव मोन्सेरात यांनी पुढे आणला आहे. भाजपने हा प्रस्ताव अजून गंभीरपणे घेतला नसल्याने मोन्सेरात यांची डाळ शिजू शकलेली नाही.
प्रसंग येताच काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची तयारी मोन्सेरात यांनी ठेवली आहे. आपण, आपली पत्नी तथा ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात व कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर हे काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात, असे संदेश मोन्सेरात यांनी भाजपपर्यंत पोहोचविले. भाजपच्या संघटनात्मक कामाशी संबंधित एका प्रबळ पदाधिकाऱ्याशी त्यांची बोलणीही झाली. मात्र, मडकईकर यांनी आपण २०१७ सालची निवडणूक काँग्रेसच्याच तिकिटावर लढवणार असून काँग्रेस पक्ष सोडण्याचा आपला मुळीच विचार नाही, असे मोन्सेरात यांना सांगितल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी स्पष्ट केले. मोन्सेरात यांना कोणत्याही स्थितीत काँग्रेस
सोडून भाजपशी सोयरिक जुळवायची आहे.
माविन गुदिन्हो, मिकी पाशेको यांनीही भाजपशी स्वत:ची सोयरिक जुळविण्याचा प्रयत्न केला; पण त्या दोघांनाही लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपचा प्रतिसाद मिळालेला नाही. मोन्सेरात यांचाही विषय भाजपने गंभीरपणे घेतलेला नाही; पण मोन्सेरात यांनी पत्नीसह पुन्हा निवडणुकीस सामोरे जाण्याची तयारी असून निवडून आल्यास आपल्याऐवजी पत्नीला मंत्रिपद द्यावे, अशी चर्चा भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी केली आहे. मोन्सेरात यांच्या विश्वासातील कार्यकर्त्यांनी मात्र ‘लोकमत’शी बोलताना या सगळ्या अफवा असल्याचा दावा केला.
दरम्यान, कुणालाही पक्ष सोडून जायचा असेल, तर त्यांनी खुशाल जावे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले आहे. (खास प्रतिनिधी)