अपक्ष आमदारांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा
By Admin | Updated: November 24, 2015 01:30 IST2015-11-24T01:29:48+5:302015-11-24T01:30:07+5:30
पणजी : एफटीआयआयच्या आंदोलक विद्यार्थ्यांना अपक्ष आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी पाठिंबा

अपक्ष आमदारांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा
पणजी : एफटीआयआयच्या आंदोलक विद्यार्थ्यांना अपक्ष आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या विद्यार्थ्यांनी येथील पिएदाद इन्स्टिट्यूट सभागृहात आयोजिलेल्या समांतर चित्रपट महोत्सवास सरकारने पोलिसी बळाचा वापर करून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्यास मतदारसंघातील लोकांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशाराही या तिन्ही आमदारांनी दिला.
तिन्ही अपक्ष आमदारांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली. आघाडीचे चित्रकार सुबोध केरकर यांनीही विद्यार्थ्यांना समर्थन दिले आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नसल्याचे जे विधान केले आहे त्याचा आमदार सरदेसाई यांनी निषेध केला. ते म्हणाले की, राज्यात आणीबाणीसदृश स्थिती आहे.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना इफ्फीस्थळी जी वागणूक दिली जात आहे ती पाहता हुकूमशाहीच चालल्याचे दिसते. केंद्रात भाजपने मर्जीतील लोकांची नियुक्ती करून एफटीआयआय संस्थाच हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेच्या संचालकपदी नेमलेली व्यक्ती त्या पदास पात्र नाही आणि त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळ केला जात आहे. राज्य सरकार इफ्फीचे आयोजन करते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
सरदेसाई यांनी असाही आरोप केला की, पोलिसांचे दंडेलशाही इफ्फीच्या ठिकाणीच नव्हे, तर इतरत्रही घडत आहे. फा. बिस्मार्क यांना न्याय मिळावा या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी हात टाकला. गोव्याचे नाव यामुळे खराब होत आहे.
आमदार रोहन खंवटे यांनीही राज्यात हुकूमशाही चालू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे.
भाजप विरोधात असताना त्यांचे आमदार मनाविरोधात काही झाले तर रस्ते अडवायचे. आता इतरांनी ते केले तर सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. केवळ एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचाच छळ चालला आहे, असे नव्हे तर अन्य बाबतीतही असेच घडत आहे. फा. बिस्मार्क प्रकरणात आंदोलकांना पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळले ते चुकीचे आहे.
आघाडीचे चित्रकार सुबोध केरकर यांनीही या विद्यार्थ्यांना पाठिंबा देताना एफटीआयआयसारख्या प्रतिष्ठेच्या संस्थेशी भाजप सरकारने खेळ मांडल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, कला कोणतीही असो ती बहरावी, या क्षेत्रात अधिकाधिक लोकांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पात्र नसलेल्या व्यक्तीला संस्थेच्या प्रमुख पदावर बसविणे अन्यायकारक आहे. ते खपवून घेता कामा नये. अपक्ष आमदार नरेश सावळही या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)